प्राध्यापकांची संघर्ष समिती स्थापन
By Admin | Updated: March 16, 2015 00:04 IST2015-03-15T23:18:18+5:302015-03-16T00:04:35+5:30
मिरजेत मेळावा : विनाअनुदानित व तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना नियुक्ती व वेतनाची मागणी

प्राध्यापकांची संघर्ष समिती स्थापन
मिरज : विनाअनुदानित व तासिका तत्त्वावरील वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांना कायमस्वरूपी नियुक्ती व वेतनाच्या मागणीसाठी शासनासोबत संघर्ष करण्याचा निर्णय मिरजेतील मेळाव्यात घेण्यात आला. माजी आमदार शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली तासिका तत्त्वावरील व कायम विनाअनुदानित प्राध्यापक संघर्ष कृती समितीची स्थापना करण्यात आली.
मिरज महाविद्यालयात आयोजित प्राध्यापकांच्या मेळाव्यात जिल्ह्यातील विविध संस्थांमध्ये तासिका तत्त्वावर व विनाअनुदानित तत्त्वावर काम करणारे प्राध्यापक उपस्थित होते. तासिका तत्त्वावरील प्राध्यापक पूर्णवेळ वर्षभर काम करतात. परीक्षा, नॅक मानांकन यासह अनेक शैक्षणिक कामांना त्यांना जुंपण्यात येते. मात्र त्यांना अत्यंत तुटपुंजे वेतन देण्यात येते. तासाला २४० रूपये व मासिक ६ हजार ७०० रूपये तासिका तत्त्वावर काम करणाऱ्यांची संख्या मोठी असतानाही प्राध्यापकांच्या निवृत्तीचे वय ६२ करण्याच्या हालचाली सुरू आहेत. पात्रताधारक प्राध्यापक उपलब्ध असताना, प्राध्यापकांच्या निवृत्तीचे वय वाढविण्यात येऊ नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तासिका तत्त्वाप्रमाणेच कायमस्वरूपी विनाअनुदानित महाविद्यालयात काम करणाऱ्या प्राध्यापकांची अवस्था दयनीय आहे. विनाअनुदानित संस्थांना अनुदान देऊन येथे पूर्वीपासून काम करणाऱ्या शिक्षकांना सेवेत घ्यावे, प्राध्यापकांच्या रिक्त जागा भराव्यात, तासिका तत्त्वावरील नियुक्त्यांना शासनमान्यता देऊन कर्नाटकप्रमाणे दरमहा १६ हजार रूपये वेतन द्यावे आदी विविध मागण्या करण्यात आल्या. दहा ते पंधरा वर्षे काम करणाऱ्या प्राध्यापकांना नोकरीत स्थैर्य नसल्याने त्यांची अवस्था बिकट झाली आहे. शिक्षण क्षेत्रातील या वंचित घटकासाठी संघर्ष करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रा. शरद पाटील यांनी सांगितले. कौटुंबिक व मानसिकदृट्या स्थिर नसलेल्या अध्यापकांच्या कामावर परिणाम होत असल्याचे सांगितले. यावेळी संघर्ष कृती समितीची स्थापना करून अध्यक्षपदी प्रा. लक्ष्मण शिंदे, कार्यवाहपदी अभिजित तवटे, विनायक पवार, प्रा. डॉ. अल्का पाटील, तर उपाध्यक्षपदी प्रा. नितीन सावंत यांची निवड करण्यात आली. तसिका तत्त्वावरील व विनाअनुदानित तत्त्वावरील प्राध्यापकांच्या मागण्यांसाठी प्रा. शरद पाटील यांच्या नेतृत्वाखाली कृती समितीचे पदाधिकारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षणमंत्र्यांची भेट घेणार आहेत. यासाठी आजपासूनच नियोजन सुरु करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. (वार्ताहर)