गुंडेवाडीमध्ये मिरवणुकीत दोन गटामध्ये हाणामारी
By Admin | Updated: June 12, 2016 01:13 IST2016-06-12T01:13:19+5:302016-06-12T01:13:19+5:30
तिघांना अटक : दगडफेकीमुळे गावात तणाव

गुंडेवाडीमध्ये मिरवणुकीत दोन गटामध्ये हाणामारी
मिरज : गुंडेवाडी (ता. मिरज) येथे शुक्रवारी रात्री अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर काही जणांनी दगडफेक करून डिजिटल फलक फाडल्याने दोन गटात तणाव निर्माण झाला होता. यातून मिरवणुकीतील दोघांना लोखंडी गज व दगडाने मारहाण करण्यात आली. याबाबत ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली आहे.
गुंडेवाडी येथे अहिल्यादेवी तरूण मंडळातर्फे बस स्थानकापासून ग्रामपंचायतीपर्यंत ट्रॅक्टरमधून अहिल्यादेवी प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणूक सुरू असताना ध्वनिक्षेपकाचा आवाज मोठा असल्याचा आक्षेप काही जणांनी घेतल्याने दोन गटात वाद निर्माण झाला. यातून मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. जमावाने फलकही फाडले. अनिकेत लक्ष्मण पाटील या मुलास दगड लागल्याने, त्याबाबत जाब विचारण्यास गेलेल्या कुमार दत्तात्रय पाटील व ओंकार पाटील यांना चार जणांनी बेदम मारहाण केली. ओंकार पाटील यांच्या डोक्यात लोखंडी गजाने वार केल्याने ते जखमी झाले. त्यांना उपचारासाठी मिरज शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेमुळे गावात मोठा तणाव निर्माण झाला होता. तरीही पोलिस फिरकले नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली. रात्री उशिरा पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी दोन्ही गटाच्या समर्थकांची गर्दी झाली होती.
याबाबत पोलिसांनी सुरुवातीस अदखलपात्र तक्रारीची नोंद करून शनिवारी गुन्हा दाखल केला. मारहाणप्रकरणी भगवान खांडेकर, विजय खांडेकर, राजेंद्र खांडेकर या तिघांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
परस्परविरोधी तक्रार
कुमार दत्तात्रय पाटील याने, भगवान कुशाबा खांडेकर, विजय बबन खांडेकर, राजेंद्र बबन खांडेकर, पिंटू बबन खांडेकर यांनी मिरवणूक पुढे घेण्यासाठी दमदाटी करून मारहाण केल्याची तक्रार दिली आहे. तसेच मिरवणुकीत लावलेल्या गाण्याचा आवाज कमी करा असे सांगितल्याने संभाजी हजारे, तानाजी हजारे, अनिल पाटील व गोट्या पाटील यांनी बाबासाहेब खांडेकर, राजू खांडेकर यांना मारहाण केल्याचे आशा बाबासाहेब खांडेकर यांनी तक्रारीत म्हटले आहे. परस्परविरोधी तक्रारी दाखल करून घेतल्या असून याची चौकशी पोलिस करीत आहेत.(वार्ताहर)