राज्यकर्त्यांच्या नकारात्मक भूमिकेमुळेच विकासात अडचण
By Admin | Updated: April 12, 2016 00:35 IST2016-04-11T23:12:02+5:302016-04-12T00:35:08+5:30
नानासाहेब पाटील : शहरांच्या मूलभूत सुधारणांकडे लक्ष देण्याची गरज--नेमगोंडा पाटील व्याख्यानमाला

राज्यकर्त्यांच्या नकारात्मक भूमिकेमुळेच विकासात अडचण
सांगली : शहरांचा विकास व्हावा आणि त्या विकासातून राज्याच्या उत्पन्नात भर पडावी यासाठी राज्यकर्त्यांनी भूमिका घेणे आवश्यक आहे. आगामी काही वर्षांचा विचार केला, तर देशाच्या विकासात शहरांचे महत्त्व अधोरेखित होणार असल्याने, राज्यकर्त्यांनी शहरांच्या विकासासाठी योगदान देणे आवश्यक असले तरी, दुर्दैवाने त्यांची भूमिकाच शहरांच्या विकासात अडचण ठरत असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी अप्पर मुख्य सचिव नानासाहेब पाटील यांनी सोमवारी केले.
नेमगोंडा दादा पाटील स्मृती व्याख्यानमालेत ‘स्मार्ट सिटी खरोखरच अस्तित्वात येईल काय?’ या विषयावर पाटील बोलत होते. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड, सुरेश पाटील यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
पाटील म्हणाले की, राज्याचा विचार करता, ५२ टक्के उत्पन्न हे केवळ मुंबई, ठाणे, नाशिक आणि पुणे या शहरांतून मिळत आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि प्रगत राज्य असणाऱ्या महाराष्ट्रातील शहरांचा विकास व्हावयाचा असेल, तर शहरांतील महानगरपालिका सक्षम झाल्या पाहिजेत. विद्यमान सरकारने जकात हटविण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा असून महापालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत यामुळे हटणार आहे. विदेशात कर गोळा करण्यासाठी वेगवेगळे स्रोत वापरण्यात येतात. त्याचा अवलंब करण्यात आला पाहिजे. नागरिकांचा शहरांकडे ओढा वाढत असून, त्यांना सुविधा पुरविण्याची कसरत महापालिकांना करावी लागणार आहे. देशाचे उत्पन्न ४०० टक्क्यांपर्यंत वाढविण्याची क्षमता शहरांत असल्याने राज्यकर्त्यांनी मानसिकता बदलत शहरांचा विकास साधला, तर स्मार्ट सिटीची संकल्पना प्रभावी ठरणार आहे. (प्रतिनिधी)