मिरजेत पाणीटंचाईची समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:34 IST2021-06-16T04:34:49+5:302021-06-16T04:34:49+5:30
मिरजेत भाजपचा बालेकिल्ला असलेल्या प्रभाग चारमधील भाजप नगरसेवकांना पाणीटंचाईमुळे येथील महिलांच्या रोषास सामोरे जावे लागत आहे. अमृत योजनेच्या माध्यमातून ...

मिरजेत पाणीटंचाईची समस्या
मिरजेत भाजपचा बालेकिल्ला असलेल्या प्रभाग चारमधील भाजप नगरसेवकांना पाणीटंचाईमुळे येथील महिलांच्या रोषास सामोरे जावे लागत आहे. अमृत योजनेच्या माध्यमातून मिरज शहराला २४ तास मुबलक पाणी मिळणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र कोट्यवधी रुपये खर्च केलेली अमृत योजना कार्यान्वित झाल्यापासून मिरजेतील नागरिकांना पाणीटंचाईची झळ बसत आहे.
स्थायी सभापतींच्या प्रभागात विद्यामंदिर, सावरकर चौक, भोकरे गल्ली, स्फूर्ती चौक परिसरात अमृत योजना सुरू होण्यापूर्वी पुरेशा दाबाने व नियमित पाणी मिळत होते. नागरिकांना पाण्यासाठी धावपळ करण्याची वेळ आली नव्हती. नळाला पाणी येत नाही, ते केव्हाही व कमी दाबाने येते. यामुळे नागरिक हैराण आहेत. गेल्या चार महिन्यापासून हा प्रकार सुरू आहे. याबाबत पाणीपुरवठा विभाग व नगरसेवकांकडे तक्रार करूनही परिस्थितीत फरक पडलेला नाही. स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे यांच्या प्रभागातही महिलांना पाण्यासाठी आक्रोश सुरू आहे. मंगळवारी विद्यामंदिर परिसरात नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण केले.
यावेळी महिलांनी कर्मचाऱ्यांना जाब विचारत संताप व्यक्त केला. कर्मचाऱ्यांना धारेवर धरत नळाला पुरेसे पाणी आले नाही तर महापालिका कार्यालयात व नगरसेवकांच्या घरापुढे घागरी घेऊन ठिय्या आंदोलनाचा इशारा येथील महिलांनी दिला. मिरज शहरात अनेक ठिकाणी हीच परिस्थिती असून पाण्यासाठी नागरिकांसोबत नगरसेवक रस्त्यावर उतरून आंदोलन करीत असल्याचे चित्र आहे.