शामरावनगरच्या पावसाळी पाण्याचा प्रश्न मिटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:22 IST2021-02-05T07:22:43+5:302021-02-05T07:22:43+5:30
सांगली : बारमाही पाण्याने वेढलेल्या शहरातील शामरावनगरमध्ये पावसाळ्यात पाण्याचा निचरा करण्यासाठी आता महापालिकेकडून उपाययोजना सुरू केल्या आहेत. नगरसेवक अभिजित ...

शामरावनगरच्या पावसाळी पाण्याचा प्रश्न मिटणार
सांगली : बारमाही पाण्याने वेढलेल्या शहरातील शामरावनगरमध्ये पावसाळ्यात पाण्याचा निचरा करण्यासाठी आता महापालिकेकडून उपाययोजना सुरू केल्या आहेत. नगरसेवक अभिजित भोसले यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने पाण्याचा निचरा करण्यासाठी आराखडा तयार केला जाणार आहे. त्यासाठी एजन्सी नियुक्ती करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
शामरावनगरचा परिसर मुळात बशीच्या आकाराचा आहे. या परिसरात पाण्याचा निचरा करणारी सक्षम यंत्रणा नाही. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. त्यामुळे नागरिकांना चिखल, दलदलीमुळे नरकयातना सोसाव्या लागतात. २०१९ मध्ये या परिसराला महापुराचा मोठा फटका बसला होता. त्यानंतर गतवर्षी सातत्याने पावसाचा तडाखा बसला. दरवर्षी पाण्याच्या निचऱ्याची समस्या बनली आहे. त्यात शामरावनगरमध्ये नव्याने रस्ते झाले आहेत. ते घरापेक्षा उंच असल्याने पावसाचे पाणी अनेकदा घरात शिरते. महापालिकेने भोबे गटारही बांधली आहे. पण तिचा उपयोग होण्यापेक्षा ती नागरिकांना त्रासदायक ठरली आहे.
शामरावनगरला या नरकयातनेतून बाहेर काढण्यासाठी नगरसेवक अभिजित भोसले यांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. आयुक्त नितीन कापडणीस यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद देत पाण्याच्या निचऱ्याबाबत उपाययोजना करण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार महापालिका प्रशासनाने शामरावनगरमधील पाण्याचा निचरा करण्यासाठी प्रकल्प आराखडा तयार करण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी खासगी एजन्सी नियुक्त केली जाणार आहे. येत्या आठ ते दहा दिवसात खासगी एजन्सी नियुक्त करून त्यांच्याकडून अहवाल घेतला जाईल. हा अहवाल शासनाला सादर केला जाणार असल्याचे भोसले यांनी सांगितले.