सांगली-मिरजेतील खासगी सावकार रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:32 IST2021-08-17T04:32:54+5:302021-08-17T04:32:54+5:30
सांगली : जिल्हा पोलीसप्रमुख दीक्षित गेडाम यांनी जिल्ह्यातील खासगी सावकारांविरोधात मोहीम उघडली आहे. आतापर्यंत २५ गुन्हे दाखल झाले असून, ...

सांगली-मिरजेतील खासगी सावकार रडारवर
सांगली : जिल्हा पोलीसप्रमुख दीक्षित गेडाम यांनी जिल्ह्यातील खासगी सावकारांविरोधात मोहीम उघडली आहे. आतापर्यंत २५ गुन्हे दाखल झाले असून, ५१ खासगी सावकारांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. सावकाराच्या छळामुळे त्रस्त नागरिकांनी पोलीस ठाण्याशी संपर्क साधून तक्रारी द्याव्यात, असे आवाहनही गेडाम यांनी केले आहे.
जिल्ह्यातील खासगी सावकारांविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. इस्लामपूर येथील सावकार जलाल मुसा मुल्ला (वय ४५) याच्यावर कारवाई करीत त्याच्या घरातील ११ लाख रुपयांसह कागदपत्रेही जप्त केली आहे. सांगलीतील सावकार दत्ता काका ऐगळीकर याने मिरजेतील टेलरिंग व्यावसायिकाला व्याजाच्या दरावरून जेरीस आणले होते. त्याच्याही मुसक्या आवळत टेलरिंग व्यावसायिकाची सावकारीतून सुटका केली. जत, उमदी, पलूस, तासगाव येथील सावकारावरही कारवाई करण्यात आली आहे.
विशाल विलास कुडचे या सांगलीतील सावकाराने एका व्यक्तीला तीन लाखांचे कर्ज देऊन त्याच्याकडील फौंड्रीचे पाच लाखाचे कोरशुटर मशीन काढून घेतले होते. याबाबत संजयनगर पोलिसांत गुन्हा दाखल होताच त्याला अटक केली आहे. सध्या तो पोलीस कोठडीत आहे. कुडचेबाबत नागरिकांच्या तक्रारी असतील तर त्यांनी संजयनगर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
गेल्या आठ महिन्यात बेकायदा सावकारीविरोधात २५ गुन्हे दाखल केले असून, ५१ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. ही मोहीम आणखी तीव्र करणार असल्याचे गेडाम यांनी सांगितले.