सांगलीतील मेणी फाट्या जवळ पुलावरुन खासगी बस कोसळली, नऊ जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2021 11:18 AM2021-12-09T11:18:02+5:302021-12-09T17:15:04+5:30

ही खासगी बस गोव्याहून राजस्थानला निघाली होती. सांगलीतील मेणी फाटा येथे या बसचा अपघात झाला.

Private bus accident near Meni Fata in Sangli Nine people were injured | सांगलीतील मेणी फाट्या जवळ पुलावरुन खासगी बस कोसळली, नऊ जण जखमी

सांगलीतील मेणी फाट्या जवळ पुलावरुन खासगी बस कोसळली, नऊ जण जखमी

Next

कोकरुड : मेणी (ता. शिराळा) येथे चालकाचा ताबा सुटल्याने खासगी बस पुलाच्या कठडा आणि लोखंडी पाईप तोडून वीस फूट खोल ओढ्यात कोसळली. यात नऊ जण जखमी झाले. अपघातात बसचे आठ लाखांचे नुकसान झाले. बस गोव्याहून राजस्थानकडे जाताना काल, बुधवारी (दि.८) रात्री ११ नंतर ही घटना घडली. जखमींना कराड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असून कोकरुड पोलिसात घटनेची नोंद झाली आहे.

या घटनेबाबत ताराचंद रामविलास साहू (रा. पिसागन, जि. अजमेर, राजस्थान) याने फिर्याद दिली आहे. तो आपल्या सहकाऱ्यांसह गोव्यात एक लग्न समारंभास खासगी बसने (आर.जे. ०९ पी.ए. ४१४७) गेला होता. तेथून परत बुधवारी रात्री आंबाघाट, मलकापूरमार्गे कराडकडे जात होता. मेणी (ता. शिराळा) येथे आल्यावर चालक राजुसिंग राजपूत याला रस्त्याचा अंदाज न आल्याने त्याचा बसवरील ताबा सुटला. यामुळे ओढ्यावरील पुलाचा कठडा आणि पाईपला बसची जोरदार धडक बसली. यांनतर बस पलटी होऊन थेट वीस फूट खोल ओढ्यातील पाण्यात कोसळली.

यामध्ये ताराचंद साहू, राजुसिंग राजपूत, चंद्रप्रकाश माळी, पिंटू गुज्जर, अशोक प्रजापत, जसराज जाट, गोपाल, कान्हा जाट, राजेंद्र सिंह (सर्व रा. राजस्थान) हे जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच बाजार समिती संचालक दिनकर दिंडे यांनी अमीर मोकाशी, रमजान मोकाशी, शाहरुख मोकाशी, संकेत दिंडे यांना सोबत घेऊन घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तीन तास ओढ्यातील पाण्यात उभे राहत मदत कार्य केले. दिनकर दिंडे यांनी वेळेत जेसीबी उपलब्ध केल्याने जखमींना बाहेर काढता आले. वेळेत मदत मिळाल्याने नऊ जणांचे प्राण वाचले. कोकरुड पोलिसांचेही यावेळी सहकार्य मिळाले.

Web Title: Private bus accident near Meni Fata in Sangli Nine people were injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.