कृषी उत्पन्न बाजार समित्या सक्षम करण्यास प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:27 IST2021-04-20T04:27:29+5:302021-04-20T04:27:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क विटा : कृषी उत्पन्न बाजार समित्या या शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळवून देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या उभारी ...

कृषी उत्पन्न बाजार समित्या सक्षम करण्यास प्राधान्य
लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : कृषी उत्पन्न बाजार समित्या या शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळवून देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या उभारी देण्याचे महत्त्वपूर्ण काम करीत आहेत. त्यामुळे राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचा कारभार अत्यंत पारदर्शक झाला पाहिजे, असे सांगून कृषी उत्पन्न बाजार समिती आगामी काळात अधिक सक्षम करण्यासाठी प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिली.
विटा येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी कमळापूर (ता. खानापूर) येथील राहुल साळुंखे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा मंत्री डॉ. कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी युवानेते डॉ. जितेश कदम, गजानन सुतार उपस्थित होते.
मंत्री डॉ. कदम म्हणाले, दुष्काळी समजल्या जाणाऱ्या खानापूर, कडेगाव व आटपाडी तालुक्यात आता टेंभू, ताकारी, आरफळ योजनांचे पाणी आले आहे. त्यामुळे हा सर्व परिसर आता ओलहताखाली आल्याने हरितक्रांतीचे नवे पर्व सुरू झाले आहे. पर्यायाने या तालुक्यात शेती उत्पन्नात भरीव वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत खानापूर व कडेगाव या दोन तालुक्याेचे कार्यक्षेत्र असलेली विटा येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सक्षम झाली पाहिजे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी व शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी काम करावे.
यावेळी नूतन सभापती राहुल साळुंखे यांनी विटा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असून शेतीमालाला योग्य भाव देण्याबरोबरच बाजार समितीच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी प्रकाश इनामदार यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.