लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मिरजेत बेकायदेशीर तीन पानी जुगार अड्ड्यावर छापा टाकून सातजणांना अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. संशयितांकडून रोख २८ हजार ५०० रुपये जप्त करण्यात आले असून, महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारवाई केलेल्यांमध्ये जुगार अड्डा मालक अस्लम निजामुद्दीन शेख (वय ३२, रा. मंगळवार पेठ, मिरज), सलमान महंमद चाबुकस्वार, जावेद बशीर मकानदार, खिजर आयुब पठाण, इर्शाद रफीक शेख, मुदस्सर झाकीर निकडे, मोहसिन निसार कुरुंदवाडे (सर्व रा. मिरज) यांचा समावेश आहे.
एलसीबीचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांचे पथक मिरज शहरात गस्तीवर असताना, हॉटेल अक्षयसमोर असलेल्या रुग्णालयाजवळील इमारतीत तीन पानी पत्त्यांचा जुगार चालला असल्याची माहिती मिळाली. पथकाने छापा टाकून कारवाई केली. त्यात सर्व संशयित तीन पानी जुगार खेळताना आढळून आले. त्यांच्याकडून रोख २८ हजार ५०० रुपये जप्त करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
सचिन धोत्रे, हेमंत ओमासे, शशिकांत जाधव, आदींच्या पथकाने ही कारवाई केली.