पंतप्रधानांना शेणाच्या गोवऱ्या पाठविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:31 IST2021-09-04T04:31:07+5:302021-09-04T04:31:07+5:30
सांगली : गेल्या सहा महिन्यांत घरगुती गॅस सिलिंडरचे दर दुपटीने वाढले आहेत. ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवत केंद्रात सत्तेत आलेल्या ...

पंतप्रधानांना शेणाच्या गोवऱ्या पाठविणार
सांगली : गेल्या सहा महिन्यांत घरगुती गॅस सिलिंडरचे दर दुपटीने वाढले आहेत. ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवत केंद्रात सत्तेत आलेल्या मोदी सरकारने महागाईचा कळस गाठला आहे. सिलिंडरच्या दरवाढीविरोधात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रवादी महिला आघाडीच्यावतीने शेणाच्या गोवऱ्या पाठविणार असल्याचे जिल्हाध्यक्ष डाॅ. छाया जाधव यांनी सांगितले.
जाधव म्हणाल्या की, पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीपाठोपाठ गॅस सिलिंडरचे दरही दिवसेंदिवस वाढत आहेत. काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात सिलिंडरचा दर साडेचारशे रुपये होता. त्यावेळी महागाई वाढल्याचा कांगावा करत मोदी सरकार सत्तेवर आले. गेल्या सात वर्षांत सिलिंडरचे दर दुप्पट झाले. साडेआठशे ते नऊशे रुपयांना सिलिंडर मिळत आहे. त्यामुळे गृहिणींच्या किचनचे गणितच बदलून गेले आहे.
या दरवाढीच्या निषेधार्थ सांगली विधानसभा क्षेत्राच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शनिवार, ४ रोजी शेणाच्या गोवऱ्या पाठविण्यात येणार आहेत. तसेच गॅस दरवाढीच्या निषेधार्थ दुपारी १२ वाजता जिल्हा पक्ष कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.