विट्यात परप्रांतीय शस्त्र तस्करास अटक
By Admin | Updated: May 14, 2015 23:55 IST2015-05-14T22:38:23+5:302015-05-14T23:55:48+5:30
पोलिसांची कारवाई : पिस्तुलासह आंतरराष्ट्रीय कंपनी बनावटीचे शिक्के, साचे जप्त

विट्यात परप्रांतीय शस्त्र तस्करास अटक
विटा : उत्तर प्रदेशातून गावठी बनावटीचे पिस्तूल व सोन्याच्या बिस्किटावर मारण्यात येणारे आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे शिक्के व साचे विटा येथे विक्री करण्यास आलेल्या वीरेंद्रसिंंह लाखनसिंह सेंगर (वय ४०, रा. कानपूर, उत्तर प्रदेश) यास विटा पोलीस पथकाने छापा टाकून अटक केली. त्याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल, दुबई, स्वीत्झर्लंड येथील आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या नावे तयार करण्यात आलेले सोन्याच्या बिस्किटावर मारण्यात येणारे तीन शिक्के व तीन साचे असा एकूण ५६ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गुरुवारी दुपारी विटा बस स्थानकात पोलिसांनी ही कारवाई केली.
कानपूर (उत्तर प्रदेश) येथून एक व्यक्ती गावठी बनावटीचे पिस्तूल व सोन्याच्या बिस्किटावर मारण्यात येणारे आंतरराष्ट्रीय शिक्के आणि साचे घेऊन येणार असल्याची माहिती विट्याचे पोलीस उपअधीक्षक डॉ. अभिजित पाटील यांना मिळाल्यानंतर उपनिरीक्षक अनिल मिसाळ, सलीम मुल्ला, विशाल पवार, नाना पाटील, अभिजित वाघमोडे, नंदकुमार गुरव, शिवाजी माने, महादेव शिंदे यांच्यासह पोलीस पथकाने विटा बसस्थानकात सापळा लावला. त्यावेळी बस स्थानकातील फलाट क्र. ३ वर वीरेंद्रसिंह सेंगर हा संशयितरित्या थांबलेला आढळला. साध्या वेशातील पोलिसांनी त्याची झडती घेतली असता, त्याच्याजवळ रोख ९०० रुपये व पिशवीत गावठी बनावटीचे पिस्टल, दुबईच्या कोलटी कंपनी, युबीएस, युनियन बॅँक स्वीत्झर्लंड या आंतरराष्ट्रीय नामांकित कंपनीचे सोन्याच्या बिस्किटावर मारण्यात येणारे शिक्के व तीन साचे असा सुमारे ५६ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. वीरेंद्रसिंह सेंगर याच्याविरुध्द गुन्हा दाखल असून, पोलीस तपास करीत आहेत. (वार्ताहर)
शस्त्रांची मोठी तस्करी उघडकीस येणार
उत्तर प्रदेश येथील कानपुरातून गावठी बनावटीचे पिस्टल व आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या, सोन्याच्या बिस्किटावर मारण्यात येणाऱ्या बनावट शिक्क्यांची विक्री करण्यासाठी वीरेंद्रसिंह सेंगर हा विट्यात आला होता. तो ग्राहकाच्या शोधात असताना पोलिसांनी त्याला अटक केली आहे. हा संशयित शस्त्रांची मोठ्या प्रमाणात तस्करी करीत असण्याची शक्यता आहे, असे पोलीस उपअधीक्षकांनी सांगितले.