सरकी पेंडीचा दर क्विंटलला ३३०० रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:27 IST2021-04-20T04:27:36+5:302021-04-20T04:27:36+5:30
देवराष्ट्रे : कापसातील बी म्हणजेच सरकीचे भाव क्विंटलला तीन हजारापुढे गेल्याने सरकी पेंडीचे दरही गगनाला भिडले आहेत. दररोजच्या पशुआहारात ...

सरकी पेंडीचा दर क्विंटलला ३३०० रुपये
देवराष्ट्रे : कापसातील बी म्हणजेच सरकीचे भाव क्विंटलला तीन हजारापुढे गेल्याने सरकी पेंडीचे दरही गगनाला भिडले आहेत. दररोजच्या पशुआहारात लागणाऱ्या सरकी पेंडीचा दर क्विंटलला ३३०० रुपयांवर गेला आहे. या दरवाढीने दूध उत्पादकांचे कंबरडे मोडले आहे.
सध्या बाजारात सरकीचे ५० किलोचे पोते १६०० रुपयांच्या घरात गेले आहे. मका व सरकीच्या दरांनी सलग दुसऱ्या वर्षी उच्चांक केला आहे. अमेरिकेतील मका पीक केसाळ अळीने नष्ट केल्यामुळे पशुखाद्यासाठी सरकीला मागणी वाढली आहे. मक्याचे १२०० रुपये प्रतिक्विंटल असलेले भाव २२०० रुपयांवर पोहोचले आहेत. मका मिळत नसल्याने सर्वच पशुखाद्य महागले असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
बाजारात सरकी पेंडीबरोबर इतर पशुखाद्यातही मोठी वाढ झाली आहे. गोळी पेंड प्रतिक्विंटल १३५०, भुसा ९५०, खपरी १९५०, मकाचुणी ११५० असे सध्याचे दर आहेत. सामान्य दूध उत्पादकांना जनावरांना पेंड देणे अशक्यच झाले आहे. अचानच मोठ्या प्रमाणात पशुखाद्य महागल्याने जनावरे संभाळणे ही गंभीर समस्या बनली आहे. चारादेखील मोठ्या प्रमाणात महागल्याने दुभत्या जनावरांबरोबर भाकड जनावरे सांभाळणेही कठीण झाले आहे.
आज रुपयाच्या अवमूल्यनामुळे कापसाचे दर वाढून शेतकऱ्यांना काहीसा लाभ मिळाला. अवमूल्यनामुळे कापसाची आयात मर्यादित झाली. मात्र सरकी पेंड, सरकी तेल यांचे भाव गगनाला भिडले आहेत.
चाैकट
चारा टंचाई
यंदा उन्हाळ्यात दुधाला कमी भाव मिळत आहे. पशुखाद्याबरोबर ऊस, कडबा, मक्यासह सर्वच चारा महाग झाला आहे. हा महाग चाराही काही ठिकाणी मिळत नसल्याचे दिसत आहे.