दर पडले अन् फुकट वाटली ट्रॉलीभर ढबू मिरची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:28 IST2021-08-23T04:28:09+5:302021-08-23T04:28:09+5:30
अशुतोष कस्तुरे पलूस : ‘घ्या घ्या... ढबू घ्या... फुकट घ्या...’ असा आवाज गेले दोन दिवस कुंडल आणि परिसरात घुमत ...

दर पडले अन् फुकट वाटली ट्रॉलीभर ढबू मिरची
अशुतोष कस्तुरे
पलूस : ‘घ्या घ्या... ढबू घ्या... फुकट घ्या...’ असा आवाज गेले दोन दिवस कुंडल आणि परिसरात घुमत आहे. हा कोणा व्यापाऱ्याचा आवाज नाही, तर ही आर्त हाक आहे एका शेतकऱ्याची. ढबू मिरचीचे दर गडगडले आणि हवालदिल बनलेल्या शेतकऱ्याने चक्क फुकट ढबू मिरची वाटली. ट्रॉलीभर ढबू मिरची त्यांनी लोकांना वाटली; पण अशा स्थितीतही चार पैसे त्या शेतकऱ्याला देण्याची भावना कोणाचीही झाली नाही.
कुंभारगाव (ता. कडेगाव) हे गाव भाजीपाल्याचे माहेरघर म्हटले जाते. कुंडलपासून दोन किलोमीटरवरील याच गावातील भीमराव साळुंखे हे दरवर्षी २५ गुंठे ढबू मिरचीची लागवड करतात. ही मिरची ते मुंबई, पुणे येथे पाठवतात. वाहतूक, पॅकिंग, मजुरी यासाठी किलोला सहा रुपये खर्च येतो. तेथे त्यांना पंधरा रुपये किलो दर जरी मिळाला, तरी प्रतिकिलो नऊ रुपये ढोबळ नफा राहतो. यातूनही ते समाधानी असत, कारण खर्च वजा जाता तीन ते चार महिन्यात त्यांना लाखाचा तरी फायदा होतच होता.
यंदा ढोबळी मिरचीचे पीक चांगले आहे आणि बाजारपेठेत किलोला पाच रुपयेसुद्धा दर नाही. यामुळे ढबू मिरची बाजारपेठेत आणू नका, असे व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना सांगितले. यामुळे हातातोंडाला आलेले पीक कवडीमोल किमतीने द्यावे लागणार होते.
बाजारपेठेत मिरची घेऊन जाऊन विकली, तर येण्या-जाण्याचा खर्चही भागणार नाही, म्हणून परिसरातील नागरिकांना ती फुकट वाटण्याचा निर्णय त्यांनी घेतला. भीमराव साळुंखे यांनी अंबक, चिंचणी, देवराष्ट्रे, मोहिते वडगाव, कुंडल येथे ट्रॉली भरून ढोबळी मिरची फुकट वाटली.
कोट
अशीच परिस्थिती राहिली, तर शेतकरी देशोधडीला लागेल. शेतकऱ्याला मदतीची नाही, तर पिकविलेल्या मालाला योग्य हमीभाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे.
- भीमराव साळुंखे, शेतकरी.
220821\img-20210821-wa0023.jpg
ढबू घ्या ढबू