पोलीस असल्याचे भासवून वृध्दाची ६५ हजार रुपयांची लुबाडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:17 IST2021-06-30T04:17:48+5:302021-06-30T04:17:48+5:30
कुपवाड : कानडवाडी (ता. मिरज) येथील जिनपाल बाळीशा खोत या वृध्दास पोलीस असल्याचे सांगून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन, हातातील ...

पोलीस असल्याचे भासवून वृध्दाची ६५ हजार रुपयांची लुबाडणूक
कुपवाड : कानडवाडी (ता. मिरज) येथील जिनपाल बाळीशा खोत या वृध्दास पोलीस असल्याचे सांगून त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन, हातातील अंगठी असा ६५ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्याने लंपास केला. या घटनेची कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सोमवारी दुपारी जिनपाल खोत हे कुपवाडहून कानडवाडीला मोटारसायकलवरून जात होते. त्यावेळी कुपवाड एमआयडीसीतील कानडवाडी रस्त्यालगत असलेल्या एका कंपनीसमोर अज्ञात व्यक्तीने खोत यांना हात करून थांबविले. पोलीस असल्याचे सांगून त्याने आपले ओळखपत्र दाखविले. ‘तुमच्यासारख्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी माझी या ठिकाणी नेमणूक केली आहे.’ असे सांगत त्याने खाेत यांच्या गळ्यातील चेन, हातातील अंगठी काढून घेतली. हे दागिने स्वतःजवळील कागदात बांधून खोत यांच्या खिशात ठेवून तो चोरटा मोटारसायकलवरून निघून गेला.
खोत यांनी घरात आल्यावर खिशात ठेवलेला कागद बाहेर काढून पाहिला असता सोन्याचे दागिने नसल्याचे आढळून आले. आपली फसवणूक झाल्याचे समजताच त्यांनी सोमवारी रात्री उशिरा कुपवाड पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल दिली आहे. त्यानुसार कुपवाड पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.