वसंतदादा कारखाना अध्यक्ष निवड सोमवारी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2016 23:38 IST2016-05-25T23:16:26+5:302016-05-25T23:38:40+5:30
तयारी सुरू : विशाल पाटील यांची फेरनिवड

वसंतदादा कारखाना अध्यक्ष निवड सोमवारी?
सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्यावर विशाल पाटील यांच्या गटाने एकहाती सत्ता मिळविल्यानंतर आता कारखान्याच्या अध्यक्षपदी विशाल पाटील यांचीच फेरनिवड होण्याची शक्यता आहे. जिल्हा उपनिबंधकांच्या सूचनेनुसार येत्या ३0 किंवा ३१ मे रोजी कारखान्याची पहिली सभा आयोजित केली जाणार आहे. वसंतदादा कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी पॅनेलने पुन्हा सत्ता प्रस्थापित केली. गेल्या काही वर्षांपासून वसंतदादा कारखाना अनेक अडचणींचा सामना करीत आहे. कामगारांची, ऊस उत्पादकांची देणी, वित्तीय संस्थांचे कर्ज अशा आर्थिक कसरतींमधून कारखान्याने गत हंगामात चांगले गाळप केले. आर्थिक संकटातून मार्ग काढताना विशाल पाटील यांना तारेवरची कसरत करावी लागली. त्यांच्या कालावधितच अनेक समस्या दूर झाल्याने, अध्यक्षपदी पुन्हा त्यांचीच निवड होऊ शकते. येत्या सोमवारी किंवा मंगळवारी कारखान्याची पहिली सभा आयोजित केली जाणार आहे. जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सभेत अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडण्यात येतील. अध्यक्ष निवडीची औपचारिकता असली तरी, उपाध्यक्षपदी कोणाची निवड होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यापूर्वी डी. के. पाटील यांनी पाच वर्षे उपाध्यक्ष पदाची धुरा सांभाळली होती. पॅनेलचे प्रमुख म्हणूनही त्यांना निवडण्यात आले होते. त्यामुळे त्यांचीही उपाध्यक्षपदी फेरनिवड होणार, की आणखी कोणाला संधी मिळणार, हा चर्चेचा विषय आहे. (प्रतिनिधी)