सांगलीसाठी तत्परता, मिरजेबाबत उदासीनता

By Admin | Updated: November 30, 2014 00:54 IST2014-11-30T00:51:26+5:302014-11-30T00:54:45+5:30

सुधारित नळपाणी योजना : लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षाचा फटका

Preparedness for Sangli, apathy towards mirage | सांगलीसाठी तत्परता, मिरजेबाबत उदासीनता

सांगलीसाठी तत्परता, मिरजेबाबत उदासीनता

 सदानंद औंधे / मिरज
सांगलीसाठी सुधारित नळपाणी योजना मंजूर झाली. मात्र मिरजेतील लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे मिरज शहरासाठी सुधारित नळपाणी योजना रखडली आहे. जुन्या व जीर्ण झालेल्या पाणीपुरवठा यंत्रणेवर पाणीपुरवठ्याचा मोठा ताण असल्याने दूषित पाण्याच्या समस्यांने गंभीर स्वरूप धारण केले आहे. गॅस्ट्रोने अनेक बळी गेल्यानंतर शहरातील जुन्या जलवाहिन्यांची तत्पुरती मलमपट्टी सुरू आहे. मात्र सुधारित नळपाणीपुरवठा योजना सुरू झाल्याशिवाय दूषित पाणीपुरवठ्याचा प्रश्न संपणार नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
मिरजेच्या नळपाणी योजनेचा ४५ कोटींचा खर्च ७० कोटींवर पोहोचला आहे, तर महापालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने नळ पाणीपुरवठा योजना पूर्ण होईपर्यंत आणखी काही वर्षे मिरजेतील नागरिकांना दूषित पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.
मिरज शहरासाठी ५० हजार लोकसंख्येला नळ पाणी पुरवठा करणारी ५० वर्षांपूर्वीची जुनी यंत्रणा शहरातील सुमारे अडीच लाख लोकसंख्येला पाणी पुरवठा करण्यास अपुरी ठरली आहे. मिरजेत सुमारे २० हजार नळ ग्राहकांना दररोज २७ दशलक्ष लिटर पाणीपुरवठ्याची आवश्यकता असताना, २३ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. मिरजेतून दरमहा ३० लाख पाणी बिलाचे उत्पन्न मिळते. सतरा वर्षांपूर्वी मिरज नगरपालिका असताना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमार्फत मिरज शहरासाठी सुधारित नळपाणीपुरवठा योजनेचा आराखडा तयार करण्यात आला. कर्जाऊ निधी मिळण्यासाठी आराखडा केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला. मात्र केंद्राकडून योजना मंजूर झाली नसल्याने राज्य शासनामार्फत योजनेस मंजुरी मिळविण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत. महापालिकेने केवळ दहा टक्के तरतूद केल्यास उर्वरित रक्कम राज्य शासनाकडून कर्जाऊ मिळते. मात्र योजनेसाठी आर्थिक तरतूद नसल्याने जुन्या नळपाणीपुरवठा योजनेतून दूषित पाण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
नगरसेवकांचे मौन
महाआघाडीच्या काळात तत्कालीन मंत्री जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेत मिरजेतील कारभाऱ्यांचे वर्चस्व असतानाही सांगली शहरासाठी सुधारित नळपाणी पुरवठा योजना पूर्ण झाली व मिरजेची योजना रखडली. आता महापालिकेत काँग्रेस सत्तेवर असताना मिरजेतील २४ नगरसेवकांचे सुधारित नळपाणीपुरवठा योजनेकडे दुर्लक्ष आहे. कृष्णाघाट ते मिरज मुख्य जलवाहिनीच्या कामाला शासनाची मंजुरी मिळविण्यासाठी महापालिका कार्यालयावर मोर्चा काढून दगडफेक करणारे नगरसेवक आता दूषित पाणीपुरवठ्यामुळे शहरात १३ बळी गेल्यानंतरही मौन धारण करून असल्याने नागरिकांत संतप्त प्रतिक्रिया आहेत.

Web Title: Preparedness for Sangli, apathy towards mirage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.