कडेगावात पुन्हा सत्तासंघर्षाची तयारी
By Admin | Updated: October 26, 2014 23:15 IST2014-10-26T22:28:34+5:302014-10-26T23:15:04+5:30
राजकारण तापणार : ६५ संस्थांच्या निवडणुका लवकरच

कडेगावात पुन्हा सत्तासंघर्षाची तयारी
कडेगाव : कडेगाव तालुक्यातील ६५ सहकारी संस्थांच्या संचालक मंडळाची मुदत संपलेली आहे. नवीन सहकार कायदा व नवीन नियमावलीप्रमाणे या निवडणुका होणार आहेत. डिसेंबर २०१४ अखेरपर्यंत दोन टप्प्यात या निवडणुका होण्याची शक्यता आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर थंड झालेली राजकीय हवा आता गावोगावी होणाऱ्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांनी गरम होणार आहे. प्रामुख्याने तालुक्यात ३४ सर्वसेवा सहकारी सोसायट्यांच्या निवडणुकीत अटीतटीचा राजकीय सत्तासंघर्ष होणार आहे. कडेगाव तालुक्यातील ५५ गावांमध्ये तब्बल ६५ सहकारी संस्थांची निवडणूक होणार असल्याने राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकी डॉ. पतंगराव कदम यांनी बाजी मारली असली, गावोगावी पृथ्वीराज देशमुख यांचा तुल्यबळ गड अस्तित्वात आहे. यामुळे आता पुन्हा कदम-देशमुख गटातील राजकीय सत्तासंघर्ष उफाळून येणार आहे.कडेगाव तालुक्यातील ३४ सर्वसेवा सहकारी संस्था, दोन सहकारी सूतगिरण्या, एक दूध उत्पादक संघ, चार नोकरदारांच्या पतसंस्था, १९ ग्रामीण पतसंस्था, एक इतर विविध उद्योग संस्था, अशा तब्बल ६५ सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. शासनाने नवीन सहकार कायद्यानुसार निवडणूक प्राधिकरण स्थापन करुन निवडणुकांसाठी आवश्यक ती यंत्रणा राबविली आहे. गावोगावच्या सहकारी संस्थांकडून मतदानासाठी पात्र सभासदांची कच्ची यादी मागविली आहे.
एकाचवेळी तालुक्यातील ६५ सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार असल्याने प्रशासनावरही ताण येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावोगावी सभासद याद्या मिळविण्यापासून मोर्चेबांधणीला वेग येत आहे. नव्या नियमानुसार कोण पात्र आणि कोण अपात्र याची सभासदवर्गात चर्चा सुरू आहे. नजिकच्या काळात कडेगावातील वातावरण तापणार आहे. (वार्ताहर)
ग्रामपंचायत आणि गावातील सहकारी सोसायटी या दोन्ही संस्थांमध्ये वर्चस्वासाठी राजकीय सत्तासंघर्ष परंपरागतपणे गावोगावी सुरू आहे. आता नव्या सहकार कायद्यानुसार निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी स्थानिक नेतेमंडळीही सज्ज झाली आहेत. यासाठी कच्च्या याद्यांवर सर्वांचे लक्ष आहे.