‘अंनिस’च्या संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात
By Admin | Updated: May 13, 2016 00:16 IST2016-05-12T22:51:20+5:302016-05-13T00:16:10+5:30
कॉफी वुईथ साईनाथ’
‘अंनिस’च्या संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात
सांगली : शहरात प्रथमच होत असलेल्या अंधश्रध्दा निर्मूलन साहित्य संमेलनाची तयारी जोरात सुरू असून देशभरातून येणाऱ्या साहित्यिक आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती महत्त्वाची ठरणार आहे. संमेलनाच्या निमित्ताने शहरवासीयांना दर्जेदार पुरोगामी साहित्य व विचार ऐकण्याची संधी मिळणार असल्याने या साहित्य संमेलनात शहरवासीयांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संमेलनाच्या संयोजकांनी गुरुवारी पत्रकार बैठकीत केले. शनिवार, दि. १४ व रविवार दि. १५ मे रोजी होणाऱ्या दुसऱ्या अंधश्रध्दा निर्मूलन साहित्य संमेलनाच्या तयारीबाबत माहिती देण्यासाठी गुरुवारी संमेलनाचे स्वागताध्यक्ष अॅड. के. डी. शिंदे, प्रा. प. रा. आर्डे, संजय बनसोडे, राहुल थोरात आदींनी बैठकीचे आयोजन केले होते. त्यांनी सांगितले की, माधवनगर रस्त्यावरील डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स सभागृहात संमेलन होणार आहे. दोन दिवसांपासून मंडप उभारणीचे काम सुरू आहे. राज्यातील व देशातील अनेक नामवंत साहित्यिक शुक्रवारपासून सांगलीत येण्यास सुरुवात होत आहे. पुस्तकांचे दालन उभे करण्यात येणार आहे. त्याचबरोबर व्यंगचित्र प्रदर्शन, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन या संमेलनाचे खास वैशिष्ट्य ठरणार आहे.
दरम्यान, यावेळी ‘अंनिस’च्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साहित्य संमेलन स्थळावरील फलकाचे अनावरण करण्यात आले. (प्रतिनिधी)
‘कॉफी वुईथ साईनाथ’
जागतिक कीर्तीचे ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांची उपस्थिती आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीत माध्यमांसाठी ‘कॉफी वुईथ पी. साईनाथ’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन केले असल्याचे संयोजकांनी सांगितले.
‘अंनिस’च्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साहित्य संमेलन स्थळावरील फलकाचे अनावरण गुरुवारी करण्यात आले.