विट्यात राष्ट्रवादी विरोधात सर्वपक्षीय आघाडीची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:30 IST2021-08-27T04:30:10+5:302021-08-27T04:30:10+5:30
दिलीप मोहिते लोकमत न्यूज नेटवर्क विटा : विटा नगरपरिषदेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले सत्ताधारी गटासह विरोधी गटाची मोर्चेबांधणी सुरू ...

विट्यात राष्ट्रवादी विरोधात सर्वपक्षीय आघाडीची तयारी
दिलीप मोहिते
लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : विटा नगरपरिषदेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले सत्ताधारी गटासह विरोधी गटाची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. यावेळी सत्ताधारी गटाचे नेते माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांच्या नेतृत्वाखाली विट्यात सर्वपक्षीय व समविचारी आघाडी होण्याचे संकेत मिळत आहेत. तर दुसरीकडे भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचाही गट सक्रिय झाला आहे.
विटा नगरपरिषदेची निवडणूक काँग्रेस आणि विरोधक शिवसेना यांनी पक्षाच्या चिन्हावर लढवली होती. त्यावेळी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष असलेले माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या सत्ताधारी गटाला थेट नगराध्यक्ष पदासह २४ पैकी २२ जागा मिळाल्या होत्या. तर विरोधी शिवसेनेला दोन जागांवर समाधान मानावे लागले होते. सत्ताधारी गटाचे नेते सदाशिवराव पाटील यांचे एकेकाळचे कट्टर विरोधक व मनमंदिरचे संस्थापक अशोकराव गायकवाड यांनी माजी आ. पाटील यांच्याशी हातमिळवणी करून गेल्यावेळी एकत्रित निवडणूक लढविली होती.
परंतु सध्या माजी आ. पाटील यांनी काँग्रेसला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. सध्या राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महाविकास आघाडीची सत्ता असली तरी स्थानिक पातळीवर शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी अशी प्रमुख लढत अपेक्षित आहे. यामुळे शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी विटा शहरातील अंतर्गत रस्त्यांची कोट्यवधी रुपयांची विकास कामे हाती घेतली आहेत.
विटा नगरपरिषदेवर गेल्या ५० वर्षांपासून माजी आ. सदाशिवराव पाटील गटाची एक हाती सत्ता आहे. यावेळी सत्तांतरासाठी शिवसेनेने मोर्चेबांधणी केली आहे. त्यासाठी काँग्रेससह समविचारी पक्षांना सोबत घेऊन पाटील गटाला हादरा देण्यासाठी विरोधक सज्ज झाले आहेत.
गेल्या वेळी झालेल्या निवडणुकीसाठी शहरात प्रत्येकी दोन सदस्यांचे एकूण १२ प्रभाग होते. यावेळी सन २०११ ची जनगणना विचारात घेऊन यावर्षीही प्रभाग रचना केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरात २४ सिंगल प्रभाग असतील. शहरातील अंदाजे ४० हजार मतदार संख्या विचारात घेऊन प्रत्येक सिंगल प्रभाग हा १ हजार ५०० ते १ हजार ६०० मतदारांचा तयार करण्यात येईल. शहराचे विस्तारीकरण, वाढती लोकसंख्या विचारात घेता प्रभाग रचनेत बदल आवश्यक आहेत.
विटा नगरपरिषदेला घरपट्टी, पाणीपट्टी, व्यापारी संकुल, गाळा भाडे, जाहिरात कर, खुले प्लॉट भाडे, टँकर पाणीपुरवठा यासह विविध माध्यमातून वार्षिक २० ते २५ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. सत्ताधारी गटाने गेल्या पाच वर्षात शहराच्या विकासाला गती दिली असून घनकचरा व्यवस्थापनासह घोगाव पाणीपुरवठा योजनेच्या विस्तारीकरणासाठी ३३ कोटी निधी खर्च आहे. शहरातील भुयारी गटार योजनेचा प्रस्ताव शासन स्तरावर सादर केला असून हा प्रस्तावही लवकरच पूर्ण होऊन शहराच्या विकासाला गती मिळणार आहे.