रणशिंग फुंकण्याची तयारी

By Admin | Updated: July 26, 2015 00:17 IST2015-07-26T00:06:07+5:302015-07-26T00:17:23+5:30

सांगली बाजार समिती निवडणूक : रणधुमाळी रंगणार

Preparation to blow the trumpet | रणशिंग फुंकण्याची तयारी

रणशिंग फुंकण्याची तयारी

सांगली : सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी दोन्ही पॅनेलने प्रचाराच्या माध्यमातून शड्डू ठोकला असून, येत्या दोन दिवसांत दोन्ही पॅनेलचे नेते रणशिंग फुंकणार आहेत. शेतकरी सहकारी पॅनेलच्या प्रचारप्रारंभ उद्या (रविवार) कवठेमहांकाळ येथे होत आहे. काँग्रेस आघाडीच्या प्रचाराचा नारळ मात्र ग्रामपंचायत निवडणुकीमुळे मंगळवारी फुटणार आहे. दोन्ही पॅनेलने प्रचाराचा प्रारंभ कार्यक्षेत्राचा मध्यभाग असल्यामुळे कवठेमहांकाळ येथेच करण्याचा निर्णय घेतला आहे.
आ. जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी सहकारी पॅनेलचा प्रचाराचा प्रारंभ कवठेमहांकाळ येथील महांकाली मंदिरामध्ये रविवारी सकाळी साडेअकरा वाजता होणार आहे.
जिल्ह्यात सोमवारी ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी असल्यामुळे काँग्रेसप्रणित वसंतदादा रयत पॅनेलचा प्रचार प्रारंभ मंगळवारी (दि. २८ जुलै) कवठेमहांकाळमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी दिली.
बाजार समितीच्या १९ जागांसाठी ७० उमेदवार मैदानात असून, सोसायटी, व्यापारी, ग्रामपंचायत व हमाल तोलाईदार गटात सर्वाधिक उमेदवार आहेत. ग्रामपंचायत २ जागा, १० उमेदवार, सोसायटी ७ जागा, २१ उमेदवार, महिला २ जागा, ४ उमेदवार, भटके विमुक्त १ जागा, २ उमेदवार, ओबीसी १ जागा, ५ उमेदवार, आर्थिक दुर्बल १ जागा, ४ उमेदवार, अनुसूचित जाती-जमाती १ जागा, ३ उमेदवार, व्यापारी २ जागा, १३ उमेदवार, प्रक्रिया १ जागा, ३ उमेदवार, हमाल-तोलाईदार १ जागा, ५ उमेदवार रिंगणात आहेत.
दरम्यान, व्यापारी, हमाल, तोलाईदार प्रतिनिधींच्या प्रचाराला प्रारंभ झाला असून, इच्छुकांची संख्या अधिक असल्याने मार्केट यार्ड, विष्णुअण्णा फळ मार्केटमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे.

Web Title: Preparation to blow the trumpet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.