जलजीवन मिशन योजनेअंतर्गत ७१८ योजनांचा आराखडा तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:54 IST2021-09-02T04:54:54+5:302021-09-02T04:54:54+5:30
सांगली : जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जिल्ह्यासाठी ७१८ पाणीयोजनांचा कृती आराखडा जिल्हा परिषदेने तयार केला आहे. त्यासाठी ५४ हजार ७६५.२३ ...

जलजीवन मिशन योजनेअंतर्गत ७१८ योजनांचा आराखडा तयार
सांगली : जलजीवन मिशन योजनेअंतर्गत जिल्ह्यासाठी ७१८ पाणीयोजनांचा कृती आराखडा जिल्हा परिषदेने तयार केला आहे. त्यासाठी ५४ हजार ७६५.२३ लाख रुपये खर्च अंदाजित आहे, अशी माहिती अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी दिली.
या योजनेअंतर्गत ६८ योजनांची पुनर्जोडणी केली जाईल. नव्याने ११० योजना राबविण्यात येतील. त्यापैकी २४७ योजनांची अंदाजपत्रके तयार आहेत. ९८ योजना तांत्रिक समितीसमोर सादर केल्या असून, त्यापैकी ७१ योजनांना तत्त्वत: मान्यता मिळाली आहे. ८१ योजनांना तांत्रिक मान्यता मिळाली आहे. ७७ योजनांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून, ७५ योजनांच्या निविदांची प्रक्रिया सुरू आहे. ४३ योजनांना कार्यारंभ आदेश दिले आहेत. ३९७ योजनांच्या निविदा तयार केल्या जात आहेत.
कोरे यांनी सांगितले की, ६६५ शाळांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली जात आहे, त्यापैकी ३४३ ठिकाणी कामे पूर्ण झाली असून, ३२२ शाळांत अद्याप सुरू आहेत. १ हजार २२ अंगणवाड्यांमध्येही पाण्याची सोय करण्यात येत आहे, त्यापैकी ७६६ अंगणवाड्यांमध्ये कामे पूर्ण झाली आहेत. २५६ ठिकाणी कामे सुरू आहेत. जिल्ह्यातील सर्व कुटुंबांना प्रतिव्यक्ती दररोज ५५ लिटरप्रमाणे नळाद्वारे पाणी पुरविण्याचे उद्दिष्ट आहे. २०२३ पर्यंत ते पूर्ण केले जाणार आहे. जलजीवन योजनेसाठी केंद्र व राज्य सरकार अर्धा-अर्धा वाटा उचलणार आहे. देखभाल व दुरुस्तीसाठी १० टक्के निधी गावाला उपलब्ध करून दिला जाईल.