गरोदर महिलांनाही आता घेता येणार कोरोना प्रतिबंधक लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:17 IST2021-07-08T04:17:51+5:302021-07-08T04:17:51+5:30
सांगली : कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन केंद्र शासनाने आता गरोदर मातांनाही कोरोना प्रतिबंधक लस घेण्यास परवानगी दिली ...

गरोदर महिलांनाही आता घेता येणार कोरोना प्रतिबंधक लस
सांगली : कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन केंद्र शासनाने आता गरोदर मातांनाही कोरोना प्रतिबंधक लस घेण्यास परवानगी दिली आहे. गरोदर मातांना प्राधान्याने लस देण्यासाठी विशेष मोहीम राबविली जाणार आहे. त्यानुसार जिल्हा परिषद आरोग्य विभागाने गरोदर मातांच्या लसीकरणावर लक्ष केंद्रीत केले आहे.
देशात लसीकरणाची मोहीम आता एक चळवळ म्हणून राबविली जात आहे. यामुळेच लसीकरणापासून कुणीची वंचित राहू नये, यासाठी आता १८ ते ४४ वयोगटाला परवानगी दिली आहे. लहान मुलांसाठीही वेगवेगळ्या लसींच्या चाचण्या सुरू आहेत. त्यात प्रश्न होता तो फक्त गरोदर महिलांचा. कारण, लसीचा प्रभाव दोन जीवांवर पडणार असल्याने गरोदर महिलांना लस देण्यावर संसोधन सुरू होते. या संशोधनात कोरोनाची लस गरोदर महिलांसाठीही सुरक्षित असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे गरोदर महिलांनाही आता लस घेता येत आहे. मात्र, लस घेणे ही त्यांची ऐच्छीक बाब असून, लस घेतल्यानंतर कित्येकांना ताप, अंगदुखी, मळमळ यासारखे त्रास जाणवतात. अशात गरोदर महिलांना असे त्रास जाणवल्यास त्यांनी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असल्याचे स्त्रीरोगतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
चौकट
गरोदर महिलांनी लस घेण्यापूर्वी...
- गर्भवती स्त्रियांना कोविड प्रतिबंधक लस घेण्याची इच्छा असल्यास, त्यांनी त्यांच्यावर उपचार करणाऱ्या स्त्रीरोगतज्ज्ञांकडून लस देण्याबाबत पत्र आणणे गरजेचे आहे.
- त्या गर्भवती महिलेला स्वत:चे संमतीपत्रही द्यावे लागणार आहे. दोन्ही कागदपत्रे लसीकरण केंद्रावर सादर केल्यास लसीकरण केले जाणार आहे.
- गर्भवती महिलांना त्यांच्या डॉक्टरांनी परवानगी दिल्यास लस देण्याची सुविधा आरोग्य विभागाने उपलब्ध केलेली आहे.
कोट
कोरोनापासून बचावासाठी प्रत्येकाने लस घेणे गरजेचे आहे. मात्र, गरोदर महिलांनी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. लस घेतल्यानंतर काही त्रास असल्यास महिलांनी फक्त पॅरासिटामॉल घ्यावी. जास्तच त्रास असल्यास अन्य कुणाच्याही सांगण्यावरून कोणतेही औषध घेऊ नये. थेट आपल्या डॉक्टरांशीच संपर्क साधावा.
- डॉ. विवेक पाटील, माता बाल संगोपन अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली.
चौकट
जिल्ह्यातील आतापर्यंतचे लसीकरण : ९,१९,५८१
पुरुष : ४,६६,५८९
- पहिला डोस ३,७०,४४६
- दुसरा डोस ९६,१४३
महिला : ४,५२,९९२
- पहिला डोस ३,५८,४४९
- दुसरा डोस ९४,५४३
कोट
शासनाने गरोदर महिलांना लस घेण्याची परवानगी दिली आहे. एखादी गरोदर महिला कोरोना पॉझिटिव्ह असेल तर तिने तीन महिने लस घेऊ नये. तीन महिन्यानंतर लस घेण्यास हरकत नाही. गरोदर महिलांनी टीटीईची लस घेतलेल्या दंडात कोरोना प्रतिबंधक लस घेऊ नये. दुसऱ्या दंडामध्ये ती घ्यावी. लस घेतल्यानंतर त्रास झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
- डॉ. विद्या जाधव, स्त्रीरोगतज्ज्ञ, सांगली.