लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : या वर्षभरात जिल्ह्यातील अपघातांचे व त्यामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले असलेतरी अजूनही अपघातांचे प्रमाण कमी होणे अपेक्षित आहे. कोरोनामुळे नसलेल्या अनेक सवयी नागरिकांनी अंगी बाणवल्या. अगदी त्याप्रमाणेच सुरक्षित वाहन चालविण्यासाठी वाहनचालकांनी प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी सोमवारी सांगलीत केले.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, वाहतूक शाखेच्यावतीने महिनाभर चालणाऱ्या रस्ता सुरक्षा अभियानाचा प्रारंभ जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले, वाहन चालवताना आवश्यक असलेल्या नियमांचे प्रत्येकाने पालन केल्यास कटू अनुभव येणार नाहीत. प्रशासनाकडूनही अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र, त्यास वाहनचालकांचा प्रतिसाद मिळणे आवश्यक आहे.
पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम म्हणाले, रस्ता सुरक्षा अभियानाचा कालावधी शासनाने वाढविल्याने वाहनचालकांत सुरक्षित वाहन चालविण्याबाबत अधिक जागरूकता होईल. वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीसाठी कारवाईबरोबरच प्रबोधनही आवश्यक आहे. अपघातामुळे होणारी हानी टाळण्यासाठी नागरिकांनी स्वतःहूनच नियम पाळल्यास त्याचा फायदा होणार आहे.
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय साळुंखे, आयुक्त नितीन कापडणीस, अपर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले, पोलीस उपअधीक्षक अजित टिके, सहायक निरीक्षक प्रज्ञा देशमुख आदी उपस्थित होते.
चौकट
यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विलास कांबळे यांनी सुरक्षित वाहन चालविण्याविषयी उपस्थितांना शपथ दिली. तसेच महिलांना हेल्मेटचे वितरण करण्यात आले. अभियानाच्या पहिल्या दिवशी वाहतूक नियम सांगणाऱ्या रॅलीचे आयोजन करण्यात आले हाेते. शहरातील प्रमुख मार्गावरूनही महिलांची दुचाकी रॅली काढण्यात आली.