मिरजेतील प्रताप कॉलनी, गंगानगर परिसरात पूरस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:18 IST2021-06-18T04:18:44+5:302021-06-18T04:18:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मिरज : मिरजेत गुरुवारी रात्री व दिवसभर जोरदार पावसाने ठिकठिकाणी शहरात व विस्तारित भागात, सखल भागात ...

मिरजेतील प्रताप कॉलनी, गंगानगर परिसरात पूरस्थिती
लोकमत न्यूज नेटवर्क
मिरज : मिरजेत गुरुवारी रात्री व दिवसभर जोरदार पावसाने ठिकठिकाणी शहरात व विस्तारित भागात, सखल भागात पाणी साचले होते.
रेल्वेस्थानकाजवळ प्रताप कॉलनी व गंगानगर परिसरात पूरस्थिती निर्माण झाली होती.
मिरजेत प्रताप कॉलनी व रेल्वेस्टेशनशेजारील रॉकेल डेपो झोपडपट्टीत घरात पावसाचे पाणी शिरले होते. गेल्या सात वर्षांपासून येथे पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होत आहे. प्रत्येक पावसात हे पाणी वाढतच असते. येथे घरापर्यंत दुचाकी, चारचाकीसह महापालिकेचे कोणतेही वाहन अग्निशमन, रुग्णवाहिकाक, शववाहिका पोहोचू शकत नाहीत. प्रत्येकाच्या दारात चार फूट पाणी साचत असल्याने जोरदार पाऊस झाल्यास पाणी ओसरेपर्यंत नागरिकांना घरातच थांबावे लागते. येथील ड्रेनेज यांत्रणा सदोष असून पाणी निचऱ्याची व्यवस्था नसल्याने महापालिका अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन साचणाऱ्या पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था करण्याची नागरिकांची मागणी आहे. मात्र, दरवर्षी या समस्येला नागरिकांना तोंड द्यावे लागत असल्याने संतप्त नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
रेल्वेस्थानकापलीकडे गंगानगर या विस्तारित भागातही गुरुवारी झालेल्या पावसाने नागरिकांच्या दारात पूरस्थिती निर्माण झाली होती. येथे पूर आल्याने अनेक घरांत पाणी घुसले होते. या भागातील नैसर्गिक नाल्याची प्रत्येक वर्षी महापालिकेकडून नालेसफाई होते. या नैसर्गिक नाल्यातील पाणी आजूबाजूच्या परिसरात पसरते. नैसर्गिक नाला चाैदा फूट रुंद होता, तो नाला चार फूट झाला आहे. ड्रेनेजलाइनला जोडल्याने नाल्यात जाणाऱ्या पाण्याचा फुगवटा निर्माण होऊन पाणी आजूबाजूच्या परिसरातील घरांत शिरत आहे. स्थानिक नगरसेवक आणि महापालिका प्रशासन गांधारीची भूमिका घेत असल्याने नागरिक हैराण आहेत.