प्रतीक पाटील यांची कवठेमहांकाळ तालुक्यात एंट्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:25 IST2021-02-10T04:25:47+5:302021-02-10T04:25:47+5:30
कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळच्या राजकीय पटलावरील युवावर्गात प्रतीक जयंत पाटील यांनी आपल्या दमदार अभ्यासू भाषणाने भुरळ घातली आहे. तालुक्यातील युवकांमध्ये ...

प्रतीक पाटील यांची कवठेमहांकाळ तालुक्यात एंट्री
कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळच्या राजकीय पटलावरील युवावर्गात प्रतीक जयंत पाटील यांनी आपल्या दमदार अभ्यासू भाषणाने भुरळ घातली आहे. तालुक्यातील युवकांमध्ये प्रतीक पाटील यांची मोठी क्रेझ आहे. प्रतीक पाटील यांचे तालुक्यात दौरे वाढले आहेत. जाग्यावर जनतेच्या प्रश्नांचा ते दौऱ्यामध्ये निपटारा करत असल्याने त्यांची कामाची ही पद्धत युवक व जनतेला भावली आहे.
हिंगणगाव येथे दोन दिवसांपूर्वी शंतूनू सगरे मित्रपरिवारामार्फत पालकमंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यस्तरीय पासिंग व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित केल्या होत्या. साधत शंतून सगरे यांचे नव्या दमाचे निष्ठावंत कार्यकर्ते अमित शिंत्रे, प्रवीण कुनुरे, सौरव पाटील यांच्यासह सगरे घरांवर प्रेम असणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांनी या स्पर्धा घेतल्या होत्या.
या स्पर्धेच्या निमित्ताने प्रतीक पाटील हिंगणगाव येथे आले होते. त्यांनी आपल्या भाषणांत अनेक मुद्द्यांना स्पर्श केला. बेकारी, बेरोजगारी, खेळाडू, शेतकरी, गोरगरीब जनता या सर्वांच्या प्रश्नांना हात घालत उपस्थित तरुण, बुजुर्ग यांची मने जिंकली. प्रतीक पाटील यांच्या भाषणाची चर्चा तालुक्यातील तरुणांमध्ये चांगलीच रंगली आहे. तालुक्यातील नानासाहेब सगरे, पंडितराव जाधव, गणपती कुनुरे, मारुती खोत यांच्या घराशी राजारामबापू पाटील यांचे घरोब्याचे संबंध होते. ते संबंध भविष्यात दृढ करण्यासाठी प्रतीक पाटील यांनी कवठेमहांकाळ तालुक्याचा दौरा केला आहे. शंतूनू सगरे तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी या स्पर्धेला प्रतीक पाटील यांना निमंत्रित करून तालुक्याच्या राजकारणात नाना-बापूचा राजकीय हितसंबंधाचा राजकीय वारसा पुढे चालवण्यासाठी या कार्यक्रमातून पावले उचलली आहेत. त्यामुळे या व्हॉलीबॉल स्पर्धेच्या माध्यमातून युवा नेते शंतून सगरे यांनी भविष्यातील राजकारणाचा राजकीय टॉस काढून प्रतीक पाटील यांना दिला. त्या टॉसवर प्रतीक पाटील यांनी आपण कवठेमहांकाळ तालुक्यातील जनतेचे प्रश्न थेट सोडवू, जनतेने थेट भेटावे असे सांगत त्या टॉसवर जोरदार राजकीय स्मॅश मारला. तरुणांमध्ये नेतृत्वाची छाप पाडली. त्यांच्या या राजकीय स्मॅशची जोरदार चर्चा तालुक्यात रंगली आहे. शंतून सगरे मित्रपरिवारातील अमित शिंत्रे, प्रवीण कुनुरे, सौरव पाटील या सगरेच्या बिनीच्या शिलेदारांनी हा कार्यक्रम घडवून आणून सगरे गटाला आणि नाना-बापूच्या हितसंबंधाला उजाळा दिला आहे. तालुक्यात प्रतीक पाटील, शंतून सगरे नवीन राजकीय समीकरण तयार करत आहेत. एकूणच प्रतीक पाटील यांच्या नेतृत्वाने कवठेमहांकाळ तालुक्यातील तरुणांना भुरळ घातली आहे.