प्रकाश हॉस्पिटलच्या आराेग्य शिबिरांमुळे डोंगरी भागातील लाेकांना दिलासा : शिवाजीराव नाईक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:28 IST2021-02-24T04:28:12+5:302021-02-24T04:28:12+5:30
कोकरुड : प्रकाश हॉस्पिटल, इस्लामपूर यांनी शिराळा तालुक्यातील डोंगरी विभागामध्ये आरोग्य शिबिरांचा उपक्रम घेऊन सामान्य लोकांना दिलासा दिला आहे. ...

प्रकाश हॉस्पिटलच्या आराेग्य शिबिरांमुळे डोंगरी भागातील लाेकांना दिलासा : शिवाजीराव नाईक
कोकरुड : प्रकाश हॉस्पिटल, इस्लामपूर यांनी शिराळा तालुक्यातील डोंगरी विभागामध्ये आरोग्य शिबिरांचा उपक्रम घेऊन सामान्य लोकांना दिलासा दिला आहे. गोरगरीब जनतेसाठी या आरोग्य शिबिरामुळे पहिल्या टप्प्यात होणारे प्राथमिक आजारपण निदर्शनास येत आहे. यासाठी प्रकाश हॉस्पिटलने उचललेले हे पाऊल अभिमानास्पद आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी केले.
ते शेडगेवाडी (ता. शिराळा) येथे प्रकाश हॉस्पिटल रिसर्च सेंटरच्या आरोग्य शिबिराच्या उद्घाटन समारंभावेळी बोलत होते. जिल्हा परिषद सदस्य संपतराव देशमुख, भाजप तालुकाध्यक्ष सुखदेव पाटील, विश्वास संचालक रणजीतसिंह नाईक, माजी सभापती हणमंतराव पाटील, सांगली जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष रोहित पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
नाईक म्हणाले, कोरोनाच्या महामारीच्या काळात सांगली जिल्ह्यातील महत्त्वाच्या हॉस्पिटलच्या बरोबरीने प्रकाश हॉस्पिटलने सामान्य नागरिकांना आरोग्याचा लाभ देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. कोरोनाच्या महाभयंकर संकटकाळात रक्तदानाची मोठी समस्या लक्षात घेऊन येथील युवकांनी रक्तदान, आरोग्य तपासणी शिबिराचा उपक्रम राबवून लोकांमध्ये नवसंजीवनी निर्माण करण्याचे काम केले आहे. या शिबिराच्या निमित्ताने पश्चिम भागामध्ये जनसेवेच्या दृष्टीने उचललेले महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. यावेळी सरपंच विनोद पन्हाळकर, माजी सरपंच विजय पाटील, बाजीराव सपकाळ, बाजीराव शेडगे, रंगराव शेडगे, प्रताप घाटगे, मनोज चिंचोलकर, कुमार कडोले, सुरेश चिंचोलकर, शिवाजी लाड, संदीप चोरगे, शिवाजी वाघमारे, विकास शिरसट, धनाजी सावंत, प्रमोद पाटील उपस्थित होते.