पुरोगामी कार्यकर्त्यांनी आत्मपरीक्षण करावे
By Admin | Updated: March 16, 2015 00:04 IST2015-03-15T23:21:37+5:302015-03-16T00:04:43+5:30
परिसंवादातील सूर : मूलनिवासी संघाच्यावतीने ‘सांस्कृतिक दहशतवाद व लोकशाही’ विषयावर मंथन

पुरोगामी कार्यकर्त्यांनी आत्मपरीक्षण करावे
सांगली : सांस्कृतिक दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी आपण सर्वांनी संघटित होणे आवश्यक आहे. त्याचबरोबरीने पुरोगामी कार्यकर्त्यांनी स्वत:ला समाजापासून वेगळे न मानता त्यांच्याशी एकरूप होऊन आत्मपरीक्षण करण्याची खरी गरज असल्याचे मत मूलनिवासी संघाच्यावतीने आयोजित परिसंवादात आज, रविवारी विविध वक्त्यांनी व्यक्त केले. रोटरी सभागृहात ‘सांस्कृतिक दहशतवाद आणि लोकशाही - आव्हाने आणि जबाबदारी’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना ‘अंनिस’चे अ. रा. आर्डे म्हणाले की, दहशतवाद हा एक विचार आहे. याच्या हल्ल्यात सर्वच जाती-धर्माचे लोक बळी पडले आहेत. त्यामुळे विशिष्ट जातींवर टीका करण्यात वेळ वाया घालवू नये. दहशतवाद हा पिसाळलेल्या कुत्र्यासारखा असतो. युध्दामध्ये जेवढी माणसे मृत्युमुखी पडली नाहीत, त्यापेक्षा अधिक माणसे धार्मिक दहशतवादाची बळी ठरली आहेत, हे नेहमी लक्षात ठेवावे. याचा मुकाबला एकजुटीने केला पाहिजे. पुरोगामी संघटनेतील सर्वांनीच विचारांनी एकरुप होऊन कार्य केले पाहिजे. विद्रोही संघटनेचे कार्याध्यक्ष धनाजी गुरव म्हणाले, आपण सर्वांनीच विवेकाचा आग्रह धरला पाहिजे. विनाकारण दुसऱ्या जातीबद्दल तिरस्कार करुन उपयोग नाही. त्यामुळेच आपण समाजापासून अलग पडतो आहोत. आपले शत्रू कोण आहेत याची विभागणी प्रत्येकाला विचारांच्या आधारावर करता आली पाहिजे. ज्येष्ठ विचारवंत डॉ. बाबूराव गुरव म्हणाले, सध्या पुरोगामी कार्यकर्त्यांमध्ये एक प्रकारच्या पराभूत मानसिकतेचे वातावरण आहे. हुकूमशाहीचा डंका वाजला पाहिजे म्हणून काही शक्ती प्रयत्नशील असल्या तरीही, कार्यकर्त्यांनी समाजव्यवस्थेचा अभ्यास करुन त्यानुसारच चळवळीला दिशा दिली पाहिजे. अॅड. अमित शिंदे म्हणाले, कार्यकर्त्यांची विखुरलेली ताकद एकत्र आणून चळवळ आधुनिक करण्याची गरज आहे. तसेच सध्या आपण कोठे आहोत याचाही विचार करावा. शाहीन शेख यांनी, चळवळीतील प्रत्येकाने आशावादी दृष्टिकोन ठेवावा व वाचनाचा व्यासंग वाढविण्याची अपेक्षा व्यक्त केली.
याप्रसंगी हुमायूम मुरसल, रुपेश तामगावकर, नगरसेवक संतोष पाटील आदींनीही या परिसंवादामध्ये आपले विचार व्यक्त केले. (प्रतिनिधी)