अभ्यासू नेतृत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:19 IST2021-07-15T04:19:26+5:302021-07-15T04:19:26+5:30
अॅड. सदाशिवराव (भाऊ) पाटील म्हटले की, सांगली जिल्ह्यातील एक स्वच्छ, चारित्र्यवान, उच्चशिक्षित, अभ्यासू नेतृत्व डोळ्यासमोर उभा राहते. उंच धिप्पाड ...

अभ्यासू नेतृत्व
अॅड. सदाशिवराव (भाऊ) पाटील म्हटले की, सांगली जिल्ह्यातील एक स्वच्छ, चारित्र्यवान, उच्चशिक्षित, अभ्यासू नेतृत्व डोळ्यासमोर उभा राहते. उंच धिप्पाड शरीरयष्टी व सकारात्मक देहबोली त्यांच्या पांढऱ्याशुभ्र पेहराव आणि टोपीला अधिकच शोभून दिसते. गाडीतून जात असतानाही खिडकीच्या काचा खालीच ठेवून लहानांपासून वृध्दांपर्यंत प्रत्येकाच्या नमस्काराला स्मित हास्याने नमस्कार करून साद घालत त्यांचा प्रवास सुरू असतो.
समाजकारण किंवा राजकारण करीत असताना वारसाबरोबर राजकीय वरदहस्त असणे अत्यंत आवश्यक असते. तरच कर्तृत्ववान व्यक्तीला आपले कर्तृत्व सिध्द करता येते. अॅड. सदाभाऊंना राजकारणाचा वसा आणि वारसा कै. हणमंतराव पाटील साहेब यांच्याकडून मिळाला आणि त्यांच्या चाणाक्ष बुध्दिचातुर्यावर त्यांनी तो अंगीकारला. वकिली व्यवसायातून समाजकारणात अचानकपणे येऊनही गेली तीस वर्षांहून अधिक काळ त्यांनी विटा शहराचा सर्वांगीण विकास केला आहे. फक्त विकास म्हणून विकास नाही तर दूरदृष्टी ठेऊन विकास करण्याची त्यांची धमक वेगळीच आहे. याची अनेक उदाहरणे आहेत. पण विट्याचा होणारा विस्तार, वाढती लोकसंख्या यांचा अंदाज करून भाऊंनी घोगाव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली. त्यामुळेच आता दुष्काळातही विट्याला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत नाही. त्यांच्या १० वर्षे आमदारकीच्या काळात आटपाडी, खानापूर तालुका व विसापूर सर्कल यांचा समतोल विकास साधण्याचा त्यांनी खूप प्रामाणिक प्रयत्न केला, पण सुरुवातीच्या काळात स्व. गोपीनाथराव मुंडे व स्व. विलासराव देशमुख यांचा त्यांना चांगला वरदहस्त लाभला होता. त्यामुळे आमदार ते विधानसभा तालिका अध्यक्ष, सार्वजनिक उपक्रम समिती उपाध्यक्ष या पदापर्यंत काम करून आपल्या अभ्यासू, शांत, नम्र व संयमी स्वभावाची चुणूक दाखवून दिली होती.
मा. भाऊंच्या दूरदृष्टीचे अजून एक उदाहरण म्हणजे सध्याचे आदर्श शैक्षणिक संकुल होय. विटा नगरपरिषदेचे शिक्षण सभापती असताना त्यांच्या दूरदृष्टीने लोकनेते मा. हणमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना करून प्राथमिक, माध्यमिक, पदवीपर्यंतच्या शिक्षणाबरोबर व्यावसायिक क्षेत्रातील अभियांत्रिकी, फार्मसी, नर्सिंग व इंग्रजी माध्यमाच्या शाळा आता दिमाखात एकाच छताखाली चालवून त्यांनी शिक्षणाची ज्ञानगंगा विट्यामध्ये आणली आहे.
आमदारकीच्या काळातील मा. भाऊंचे आठवड्याचे नियोजन ठरलेले असायचे. भेटीचा दिवस, मंत्रालयातील कामे अत्यंत सुसूत्रतेने ते पार पाडत होते. त्यांनी मतदारसंघातील प्रत्येक गावाला एक मोठे काम हा उपक्रम अत्यंत शिस्तीने राबविला व अंमलातही आणला. दोन्ही तालुक्यातील प्रशासकीय इमारती, आयटीआय कॉलेजच्या इमारती, मागासवर्गीत वसतिगृहे अत्यंत नियोजनबध्द पध्दतीने केली. मंत्रालयातील प्रत्येक विभागातून मतदारसंघाला एक तरी मोठे काम करायचेच असा भाऊंनी मानस ठेवून त्यांनी आग्रहाने करूनही दाखविले.
कार्यकर्त्यांना समजून घेणे, त्यांच्या कामाला प्राधान्य व न्याय देणे, प्रसंगी कार्यकर्त्यांच्या चुकीबद्दल त्यांना समज देणे, शासकीय अधिकाऱ्यांशी विनम्रपणे बोलणे अशी काही भाऊंची स्वभाव वैशिष्ट्ये आहेत. कोणीही समस्या घेऊन भाऊंकडे जावे किंवा मोबाइलवर साधा मिस्ड्कॉल द्यावा, भाऊ त्यांची समस्या शांतपणे ऐकून घेऊन ती नक्कीच सोडवितात. म्हणून तर भाऊ म्हणजे सामान्य कार्यकर्त्यांचा अभिमान आहेत. लहान मुलांपासून ते वृध्दांपर्यंत सदाशिवराव (भाऊ) पाटील हे ‘भावा’प्रमाणे प्रत्येकाच्या मदतीला हजर असतात. त्यांच्या या मनमिळावू व कार्यतत्पर स्वभावामुळेच ते सामान्य जनतेच्या हृदयसिंहासनावरील हृदयसम्राट बनले आहेत. असे अभ्यासू नेते माजी आ. सदाशिवराव पाटील (भाऊ) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
- सुभाष धनवडे, मुख्याध्यापक, आदर्श माध्य. विद्यामंदिर, विटा