जीवनात परिवर्तन करण्याची ताकद पुस्तकातच
By Admin | Updated: December 15, 2015 00:44 IST2015-12-14T23:52:33+5:302015-12-15T00:44:09+5:30
शेखर गायकवाड : रेणावी येथे १४ वे ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात

जीवनात परिवर्तन करण्याची ताकद पुस्तकातच
विटा : जीवनात परिवर्तन करण्याची ताकद पुस्तकात असते. पुस्तके माणसांचे आयुष्य बदलून टाकतात. गदिमा, व्यंकटेश माडगूळकर, शंकरराव खरात यांच्यासारखे महान साहित्यिक माणदेशाने महाराष्ट्राला दिले. परंतु, महाराष्ट्राला त्यांची कदर नाही, अशी खंत व्यक्त करून, व्यंकटेश माडगूळकर यांच्या ‘बनगरवाडी’ला नोबेल पारितोषिक देण्याची खरी गरज असल्याची अपेक्षा जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी व्यक्त केली.रेणावी (ता. खानापूर) येथे दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा यांच्या सहयोगाने श्रीमती शहाबाई यादव सांस्कृतिक, कला विकास मंचच्यावतीने रविवारी १४ व्या ग्रामीण साहित्य संमेलनात जिल्हाधिकारी गायकवाड बोलत होते. या संमेलनावेळी बाल साहित्य मंचचे उद्घाटन ‘बालभारती’चे किरण केंद्रे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी बाजार समितीचे सभापती आनंदराव पाटील, अॅड. सुभाष पाटील, सरपंच सौ. रेखा भिंगारदेवे उपस्थित होते.गायकवाड म्हणाले, लहान मुले फार संवेदनाक्षम असतात. शाळेतील मुलांच्या कथा, कविता व लेख यांचे मोठे पोस्टर तयार करून शाळेतील भिंतीवर लावले पाहिजे. जेणेकरून त्यांची प्रेरणा घेऊन इतर मुले लिहिती होतील. सांगली जिल्ह्यातील साहित्यिकांची बैठक लवकरच घेण्यात येणार असून सर्व साहित्यिकांची पुस्तके व त्यांची छायाचित्रे जिल्ह्यातील वेबसाईटमध्ये समाविष्ट करण्याचा मानस आहे. यावेळी ‘बालभारती’चे किरण केंद्रे यांनी, मुले लहान असताना त्यांना कथा, कविता लिहिण्याची आवड असते. त्यामुळे पालकांनी त्यांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. श्रीमती शहाबाई यादव विकास मंचचे सचिव धर्मेंद्र पवार यांनी स्वागत केले. रेणावी येथे ग्रामीण साहित्य संमेलनाच्या आयोजनामुळे नवोदित साहित्यिकांना मोठी संधी मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. दुसऱ्या सत्रात अंधकवी चंद्रकांत देशमुखे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन झाले. या संमेलनात राजा मंगसुळीकर, अनिल पाटील, सतीश लोखंडे, सु. धों. मोहिते, विश्वनाथ गायकवाड, एम. बी. जमादार, रघुराज मेटकरी, राहुल वीर यांनी कविता सादर केल्या. या संमेलनास बाळासाहेब लकडे, देवदत्त राजोपाध्ये, विलास पाटील, प्रा. संजय ठिगळे, किमया पाटील, सीमा सावंत, पद्माकर यादव, जितेंद्र यादव उपस्थित होते. (वार्ताहर)
रसिकांची दाद
साहित्यिक अस्मिता इनामदार, दयासागर बन्ने, जगन्नाथ विभुते यांना ‘श्रीमती शहाबाई यादव गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या संमेलनावेळी व्यासपीठावर पन्नासहून अधिक बालसाहित्यिकांनी आपल्या कथा, कविता, कथाकथन सादर केले. त्यास रसिकांनी दाद दिली.