वीज कनेक्शन तोडण्यास स्थगिती द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:19 IST2021-06-29T04:19:05+5:302021-06-29T04:19:05+5:30
सांगली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी सामना करणाऱ्या जनतेला थकीत वीज बिलापोटी महावितरण कंपनीकडून मानसिक त्रास सुरू झाला आहे. अनेकांच्या ...

वीज कनेक्शन तोडण्यास स्थगिती द्या
सांगली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी सामना करणाऱ्या जनतेला थकीत वीज बिलापोटी महावितरण कंपनीकडून मानसिक त्रास सुरू झाला आहे. अनेकांच्या घरातील कनेक्शन तोडली जात आहेत. हा प्रकार संतापजनक असून शासनाने तातडीने कनेक्शन तोडण्यास स्थगिती द्यावी, अशी मागणी सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने शासनाकडे केली आहे.
याबाबत मुख्यमंत्री, ऊर्जामंत्र्यांनाही निवेदन देण्यात आले आहे. समितीचे सतीश साखळकर म्हणाले की, कोरोनाच्या पहिल्या लाटेत वीज बिल माफीबाबत राज्य सरकारकडून वेगवेगळ्या घोषणा केल्याने ग्राहकांच्यात गोंधळ निर्माण झाला होता. त्यातच लाॅकडाऊनमुळे चार ते पाच महिने सर्वच व्यवहार ठप्प होते. तरीही जुनी थकबाकी कशीतरी ग्राहक भरत होते. त्यात पुन्हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत थैमान घातले. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन सुरू झाले आहे. सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, उद्योजक लाॅकडाऊनला मेटाकुटीला
आले असताना महावितरण कंपनीने वीज कनेक्शन तोडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांत मोठ्या प्रमाणत असंतोष पसरला आहे. भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी कनेक्शन तोडण्यास शासनाने स्थगिती द्यावी, तसेच बिलाच्या सवलतीबाबत धोरण जाहीर करावे, अशी मागणी शासनाकडे केली आहे.