माणदेशात चित्रपटनिर्मिती थांबल्याची खंत
By Admin | Updated: February 9, 2015 23:55 IST2015-02-09T23:52:22+5:302015-02-09T23:55:50+5:30
शंकर धुरी : आटपाडीत देशमुख महाविद्यालयात चित्रपट निर्मिती कार्यशाळा

माणदेशात चित्रपटनिर्मिती थांबल्याची खंत
आटपाडी : माणदेशातील ग. दि. माडगूळकर आणि व्यंकटेश माडगूळकर या बंधूंनी मराठी चित्रपट सृष्टीला सुवर्णकाळाचे दिवस दाखवले. त्या मातीतून सध्या मात्र चित्रपट निर्मिती होत नाही, ही खेदाची बाब आहे, असे प्रतिपादन प्रसिध्द चित्रपट निर्माते शंकर धुरी यांनी येथे व्यक्त केले.शिवाजी विद्यापीठाच्या अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयात आयोजित चित्रपट निर्मिती व दिग्दर्शन कार्यशाळेत ते बोलत होते. ते म्हणाले की, या क्षेत्रात छायाचित्रण, साऊंड, डिझाईन, वेशभूषा यामध्ये तरुण-तरुणींना करिअर करण्याच्या संधी आहेत. त्यासाठी लेखन, दिग्दर्शन, पार्श्वसंगीत, गायक, वादक, डबिंग या सर्व विभागांची माहिती करून घेण्याची गरज आहे. या परिसरातील गदिमा, व्यंकटेश माडगूळकर या मातीशी नाळ जोडणाऱ्या साहित्यिकांनी चित्रपटसृष्टीत अपार यश मिळविले. आजच्या पिढीनेही वास्तवाचे भान ठेवून चित्रपट निर्मिती केल्यास त्यांनाही नक्की यश मिळेल.चित्रपट दिग्दर्शक तानाजी घाडगे ‘बरड’ हा चित्रपट दाखवून म्हणाले, आशयप्रधान आणि व्यावसायिक चित्रपटांची संकल्पना वेगळी असली, तरी दिग्दर्शकाने अभ्यासपूर्ण मांडणी केल्यास चित्रपट हमखास यशस्वी होतो. आशयावर प्रामाणिकपणे काम करताना उघड्या डोळ््यांनी सूक्ष्म गोष्टी पाहणे गरजेचे आहे. चित्रपटाची भाषा कॅमेऱ्यातून प्रकट झाली पाहिजे. जीवन आणि चित्रपट यांच्यातील मांडणीचा भाग म्हणजे दिग्दर्शन. खऱ्याचा अभास निर्माण करण्यासाठी वातावरणाची परिपूर्ण माहिती असावी लागते.
कला दिग्दर्शक वासू पाटील, विजय देवकर यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. सुभाष कारंडे यांनी केले. यावेळी डॉ. विजय लोंढे, प्रा. विजय शिंदे, नरेंद्र दीक्षित, कीर्ती देशमुख, शिवप्रसाद जवळे, डॉ. शिवाजी विभुते, प्रा. संजय हजारे, प्रा. सदाशिव मोरे, डॉ. गौतम गायकवाड, महाविद्यालयीन युवक-युवती उपस्थित होते. (वार्ताहर)
चित्रपट क्षेत्रातील संधींबाबत माहिती देताना धुरी म्हणाले की, छायाचित्रण, साऊंड, डिझाईन, वेशभूषा यामध्ये करिअर करण्याच्या संधी आहेत. त्यासाठी लेखन, दिग्दर्शन, पार्श्वसंगीत, गायक, वादक, डबिंग या सर्व विभागांची माहिती गरजेची आहे. वास्तवाचे भान ठेवून चित्रपट निर्मिती केल्यास यश निश्चित आहे.