पोस्टमनने टाकली रस्त्यावरच पत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:26 IST2021-04-04T04:26:19+5:302021-04-04T04:26:19+5:30
सांगली : शहराच्या वसंतदादा कारखाना परिसरातील उपनगरांमधील अनेक पत्रे पोस्टमनने सांगलीच्या शिवोदयनगरमध्ये रस्त्यावरच टाकून दिली. त्यात कुपवाड परिसरातील काही ...

पोस्टमनने टाकली रस्त्यावरच पत्रे
सांगली : शहराच्या वसंतदादा कारखाना परिसरातील उपनगरांमधील अनेक पत्रे पोस्टमनने सांगलीच्या शिवोदयनगरमध्ये रस्त्यावरच टाकून दिली. त्यात कुपवाड परिसरातील काही पत्रांचा समावेश होता. या प्रकारामुळे नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
पोस्ट विभागाकडून उशिरा पत्रे येण्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. मात्र, पत्रे व पार्सल रस्त्यावरच टाकून देण्याचा अजब प्रकार प्रथमच दिसून आला. शिवोदयनगर येथील एका नागरिकाला रस्त्याच्या कडेला पत्रे आढळून आली. यात बँकांचे स्टेटमेंट्स, महत्त्वाची पत्रे, पार्सल यांचा समावेश आहे. ज्याला ही पत्रे सापडली, त्यांनी शिवोदयनगरमधील काही ओळखीच्या नागरिकांच्या घरी त्यांची पत्रे पोहोच केली.
पोस्टमनने ही पत्रे का व कशासाठी टाकली, हे कळले नाही. पत्रे पडली असतील, तर त्याचा संबंधित पोस्टमनने शोध का घेतला नाही किंवा तशी तक्रार कार्यालयात का दिली नाही, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत. अनेक पोस्टमन जबाबदारीने काम करीत असताना, एखाद्या व्यक्तीच्या अशा दुर्लक्षामुळे संपूर्ण पोस्ट विभागाला नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागते.