तासगावात नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीत खलबते

By Admin | Updated: September 13, 2016 00:50 IST2016-09-12T23:58:20+5:302016-09-13T00:50:22+5:30

नाराजांवर डोळा : पक्षादेश की गुप्त मतदान घ्यायचे, याबाबत संभ्रम; पालिकेतील राजकारण रंगले

For the post of municipal chief of the hour, he is in the NCP | तासगावात नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीत खलबते

तासगावात नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीत खलबते

दत्ता पाटील--तासगाव नगरपालिकेतील राजकारण निवडणुकीच्या तोंडावर अधिकच रंगतदार होताना दिसून येत आहे. राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षपदासाठी सुरेश थोरात यांचा अर्ज कायम राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पक्षादेश बजावायचा की भाजपांतर्गत नाराजीचा फायदा घेण्यााठी गुप्त मतदानाची मागणी करायची, याबबात राष्ट्रवादीत घुसळण सुरू आहे.
भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी राजू म्हेत्रे यांचे नाव निश्चित झाल्यानंतर, भाजपमधील नगरसेवकांच्या एका गटाने नाराज होत खासदारांकडे राजीनामे दिले. या नाराजीने भाजपमध्ये अद्यापही चांगलीच धुसफूस सुरू आहे. भाजपच्या अंतर्गत गटबाजीचा फायदा घेण्यासाठी राष्ट्रवादीनेही आगामी निवडणुकीच्या तोंडावर कंबर कसली आहे. अल्पमतात असूनदेखील राष्ट्रवादीकडून नगरसेवक सुरेश थोरात यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. भाजपच्या नगरसेवकांत सुंदोपसुंदी कायम असल्यामुळे राष्ट्रवादीत नगराध्यक्षपदाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आमदार सुमनताई पाटील, जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदेंशी संपर्क साधला आहे.
राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष करण्यासाठी पक्षातील नगरसेवकांसह वरिष्ठ नेत्यांकडून व्यूहरचना तयार करण्याचे काम सुरू आहे. भाजपमध्ये असणाऱ्या अनिल कुत्ते आणि शरद मानकर या दोन नगरसेवकांचा अपवाद वगळल्यास, सर्व नगरसेवक राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीने पक्षादेश बजावल्यास या नगरसेवकांची कोंडी होऊ शकते. त्यामुळे पक्षादेश बजावण्यात यावा, असा एक मतप्रवाह राष्ट्रवादीत आहे, तर निवडणुकीसाठी अवघा तीन महिन्यांचा कालावधी असल्याने पक्षादेश प्रभावी ठरणार नाही, त्यामुळे भाजपमधील नाराजांना हाताशी धरुन गुप्त मतदानाची मागणी करण्यात यावी, असे काही पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. नेमका कोणता निर्णय घ्यायचा, याबाबत अद्यापही राष्ट्रवादीत खलबते सुरू आहेत.
दोन दिवसांत याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त होत असली तरी, या निमित्ताने थोरात यांचा अर्ज कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.


भाजपमधील नाराज नगरसेवकांशी संधान
भाजपचे राजू म्हेत्रे यांचे नगराध्यक्षपद निश्चित झाल्यामुळे भाजपचा दुसरा गट नाराज झाला आहे. तर काही नगरसेवकांचा इगो दुखावल्याचीही चर्चा आहे. नाराजी दूर करण्यासाठी खासदार संजयकाका पाटील यांनी स्वत: प्रयत्न केले नसल्याची चर्चा आहे. तर नाराज गट खासदारांशी निष्ठा कायम ठेवून विरोधी गटाचे खच्चीकरण करण्यासाठी राष्ट्रवादीला छुपी मदत करू शकतो. ही शक्यता गृहीत धरुन राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनी भाजपच्या नाराज नगरसेवकांशी संधान साधल्याचीही चर्चा आहे.
तासगावात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी नगराध्यक्ष पदासाठी पक्षादेश बजावण्यात यावा, अशी मागणी केली होती. पक्षप्रतोदपदाबाबत गोंधळ आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षांच्या परवानगीने जिल्हाध्यक्ष म्हणून मी स्वत: पक्षादेश काढून तयार ठेवला आहे. दोन दिवसांत परिस्थिती पाहून पक्षादेश बजावण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. पक्षादेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित नगरसेवकांना कारवाईस सामोरे जावे लागणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंंदे यांनी दिली.

Web Title: For the post of municipal chief of the hour, he is in the NCP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.