नगराध्यक्ष पदासाठी दोन पाटलांत चुरस
By Admin | Updated: November 9, 2016 22:43 IST2016-11-09T22:43:38+5:302016-11-09T22:43:38+5:30
इस्लामपुरातील राजकारण : राष्ट्रवादीच्या धनशक्तीपुढे आघाडीची जनशक्ती मैदानात

नगराध्यक्ष पदासाठी दोन पाटलांत चुरस
अशोक पाटील ल्ल इस्लामपूर
नगराध्यक्षपद खुले पडावे यासाठी राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांनी देव पाण्यात घातले होते. त्यांच्या सुदैवाने नगराध्यक्षपद खुलेच पडले. त्यावेळीच राष्ट्रवादीतर्फे विजयभाऊंची उमेदवारी निश्चित झाली. विरोधकांत ताळमेळ नव्हता. निवडणूक एकतर्फी होणार, अशीच हवा होती. परंतु राष्ट्रवादीचे निशिकांत पाटील यांच्यारूपाने विकास आघाडीला नवसंजीवनी मिळाली. त्यामुळे आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीचा प्रश्नही आपोआपच मिटला. आता नगराध्यक्ष पदासाठी दोन पाटलांमध्ये काट्याची लढत होत आहे. यामुळे तिसऱ्या आघाडीच्या उमेदवाराचे फुटाणेही विकले जाणार नाहीत, अशी चर्चा सुरु आहे.
एकीकडे राष्ट्रवादी कार्यालयात आमदार जयंत पाटील यांचा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचा एककलमी कार्यक्रम सुरु होता. त्यावेळी तेथे अचानकपणे निशिकांत पाटील कार्यकर्त्यांसह नगराध्यक्ष पदाच्या मुलाखतीसाठी दाखल झाले. याचा दोन भाऊंना धक्का बसला. मुलाखतीनंतर स्वत: जयंत पाटील आणि निशिकांत पाटील एकाच गाडीतून गेले. या दोघांच्या गळाभेटीत काय झाले, याचा आजही उलगडा झालेला नाही आणि तो जाणून घेण्याचा कोणी प्रयत्नही केला नाही. परंतु याची चर्चा मात्र शहरात जोरदारपणे रंगली होती.
आमदार जयंत पाटील यांनी निशिकांत पाटील यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी नाकारल्याने ते नाराज झाले. यानंतर त्यांनी थेट विकास आघाडीच्या सुरु असलेल्या बैठकीत धडक मारली. पाटील यांच्या या एन्ट्रीने विकास आघाडीतील नेत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीची माळ आपसूकच निशिकांत पाटील यांच्या गळ्यात पडली. यामुळेच इस्लामपुरात नगराध्यक्ष पदासाठी दोन पाटलांची काट्याची लढत लक्षणीय ठरणार आहे.
गेल्या वर्षभरात पालिकेतील सत्ताधारी पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील आणि माजी नगराध्यक्ष अॅड. चिमणभाऊ डांगे या दोन भाऊंनी अंतर्गत तह करुनच पालिका निवडणुकीत उतरण्याचे नियोजन केले होते. सुदैवाने विजयभाऊ पाटील यांना लॉटरी लागली. नेहमीच्या सवयीप्रमाणे विजय पाटील यांना खोडा घालण्याचे काम एन. ए. गु्रपच्या खंडेराव जाधव यांनी केले. परंतु जयंत पाटील यांच्यापुढे त्यांची डाळ शिजली नाही. तरीसुध्दा जाधव यांनी एन. ए. गु्रपच्या माध्यमातून स्वत:च्या कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळवून देण्याचे काम फत्ते केले. नगरपालिकेतील राजकारणात पदाधिकारी व कार्यकर्त्याचा ‘करेक्ट कार्यक्रम’ कसा करायचा, याचे राजकीय गणित ठरले आहे. खंडेराव जाधव यांना इतर प्रभागात हस्तक्षेप करण्यास संधी मिळू नये, म्हणून प्रभाग १२ मधून गेल्या वर्षभरापासून कामाला लागलेल्या महाडिक युवा शक्तीच्या अमित ओसवाल यांच्याविरोधात खंडेराव जाधव यांना निवडणूक लढविण्यास भाग पाडले आहे. निवडणुकीत एन. ए. गु्रपची काय रणनीती असेल, हे निकालानंतरच स्पष्ट होईल. पहिल्या टप्प्यात इस्लामपूर नगरपालिकेची ही निवडणूक राष्ट्रवादीला एकतर्फी असेल असे वाटत होते. विकास आघाडीत पायपोस नव्हता. त्यातच अनिल माने यांनी मानवाधिकार संघटनेच्या माध्यमातून तयार केलेल्या तिसऱ्या आघाडीला महत्त्व प्राप्त होणार, इतक्यातच निशिकांत पाटील यांच्या विकास आघाडीतील प्रवेशाने तिसऱ्या आघाडीचा विषयच समाप्त झाल्याची चर्चा आहे.
मोट बांधली, पण..!
खासदार राजू शेट्टी, मंत्री सदाभाऊ खोत यांनी विरोधकांची मोट बांधली. नगरपालिकेच्या रानात पेरणीची तयारी सुरू केली. नगराध्यक्ष पदासाठी मशागत करताना तरुण आणि नवखं खोंडही त्यांना मिळालं. मशागती पूर्ण झाल्या, त्यात पाऊसही समाधानकारक झाला. विकास आघाडीच्या शिवारात पाणीही फिरलं. पिकांची चांगली उगवण झाल्याने यंदाचा हंगाम चांगला जाणार, या कल्पनेने आनंदी झालेले शेट्टी आणि खोत बांधावर बसून खर्डा—भाकरी खाणार, इतक्यात शिराळ्यातून शिवाजीराव आणि पेठनाक्यावरुन नाना आले. त्यांनी पिकाच्या लागवडीसाठी लागणाऱ्या पैशाचे काय? असा सवाल करताच सदाभाऊ अवाक् झाले. पेरणीसाठीच्या मुख्य गोष्टीचीच तजवीज राहिल्याची बाब त्यांच्या लक्षात आली.
लागवडीचा डोस..!
नगरपालिकेच्या प्रभाग क्र. १० मधील शिवारात धनुष्यबाणाने पेरलेल्या पिकाची उगवण चांगली झाली. इथं शिवसेनेच्या आनंदराव बापू यांनी दिलेल्या लागवडीचा ‘डोस’ चांगलाच कामी आला. त्यातच शिवारात उगवलेले राष्ट्रवादीचे तण काढण्यासाठी मारलेल्या तणनाशकानेही आपले काम फत्ते केले.