नगरसेविका नदाफ यांचे पद कायम
By Admin | Updated: October 6, 2015 00:36 IST2015-10-05T23:24:07+5:302015-10-06T00:36:13+5:30
पोटनिवडणूक रद्द : भाजपच्या गटात सामील; राष्ट्रवादीला आणखी धक्का

नगरसेविका नदाफ यांचे पद कायम
तासगाव : तासगाव नगरपालिकेतील राष्ट्रवादीच्या नगरसेविका डॉ. आयेशा नदाफ यांचे अपील मान्य करत नगरविकास विभागाने नगरसेवक पद कायम ठेवले. त्यामुळे प्रभाग एकमधील पोटनिवडणूक रद्द झाली आहे. मात्र नगरसेविका नदाफ यांनी खासदार संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांचे पद राहिले तरी, पक्ष सोडल्यामुळे राष्ट्रवादीला आणखी एक मोठा हादरा बसला असून राष्ट्रवादीची टिकटिक केवळ एका नगरसेवकापुरतीच राहिली आहे.
माजी गृहमंत्री आर. आर. पाटील गटाच्या नगरसेविका डॉ. आयेशा नदाफ सलग सहा महिने सर्वसाधारण सभेसाठी गैरहजर राहिल्या होत्या. त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी दीड वर्षापूर्वी खासदार संजयकाका पाटील गटाच्या नगरसेवकांनी नगरपालिकेच्या सभेत ठराव केला होता. त्यानुसार नगरसेविका नदाफ यांचे जिल्हाधिकाऱ्यांकडून पद रद्द करण्यात आले होते. उच्च न्यायालयानेही त्यांची याचिका फेटाळली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून नदाफ यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम सोमवारी जाहीर केला आहे. त्यानुसार १३ ते १७ आॅक्टोबरदरम्यान अर्ज दाखल होणार होते, तर १ नोव्हेंबरला मतदान होणार होते. तत्पूर्वी डॉ. नदाफ यांनी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडे अपील दाखल केले होते. त्यानुसार डॉ. नदाफ यांचे नगरसेवक पद कायम ठेवण्यात आले. डॉ. आयेशा नदाफ यांचे पद रद्द व्हावे, यासाठी खासदार संजयकाका गटाच्या नगरसेवकांनीच पुढाकार घेतला होता. वर्षभरापासून त्याबाबत पाठपुरावा सुरु होता. मात्र काही दिवसांपासून काका गटाच्या नगरसेवकांनीच डॉ. नदाफ यांचे पद कायम राहावे, यासाठी पुढाकार घेतला होता.
आता डॉ. नदाफ यांचे पद कायम राहिले असले तरी, त्यांनी खासदारांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे काका गटाच्या नगरसेवकांनी खेळलेली खेळी यशस्वी ठरली असून पालिकेच्या राजकारणात राष्ट्रवादी आणखीनच गोत्यात आली आहे. (वार्ताहर)
घ
ट
ना
क्र
म
नगरसेविका डॉ. आयेशा नदाफ दीड वर्षापूर्वी सलग सहा महिने सभांना गैरहजर
काका गटाच्या नगरसेवकांकडून रजा अर्ज मंजुरीला विरोध, पद रद्द करण्यासाठी हालचाली
नगरसेवक पद रद्द करण्याचा ठराव काका गटाच्या नगरसेवकांच्या बाजूने मंजूर
खासदार संजयकाका समर्थक अनिल कुत्ते आणि काँग्रेसचे नगरसेवक संजय पवार यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे सदस्यत्व रद्दसाठी याचिका
जिल्हाधिकाऱ्यांकडून डॉ. नदाफ यांचे नगरसेवक पद रद्दचा निर्णय
डॉ. नदाफ यांच्याकडून उच्च न्यायालयात अपील
उच्च न्यायालयाकडून स्थगिती न मिळाल्याने पोटनिवडणूक जाहीर
डॉ. नदाफ यांच्याकडून नगरविकास विभागाकडे अपील
सोमवारी डॉ. नदाफ यांच्याबाजूने नगरविकास विभागाचा निर्णय.
नगरसेवक पदाबाबत आमची भूमिका योग्य असल्याचे नगरविकास विभागाच्या निर्णयानंतर स्पष्ट झाले आहे. पालिकेवर खासदार संजयकाका पाटील यांच्या गटाची सत्ता आहे. राज्यातही भाजपची सत्ता आहे. त्यामुळे शहराच्या विकासासाठी यापुढे आमची वाटचाल भाजपसोबतच असेल. यापुढे खासदार संजयकाका पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार काम करू.
- डॉ. आयेशा नदाफ, नगरसेविका, तासगाव