सांगलीत १२० टन मिठाचा साठा ताब्यात
By Admin | Updated: July 25, 2015 01:14 IST2015-07-24T00:19:00+5:302015-07-25T01:14:36+5:30
चौघांविरुद्ध गुन्हा : बेकायदा ट्रेडमार्कचा वापर करून विक्री

सांगलीत १२० टन मिठाचा साठा ताब्यात
मिरज : गुजरात येथील सागर ब्रँड मिठाचा ट्रेडमार्क वापरून ‘सागर प्लस’ नावाने विक्री करण्यात येणारा सुमारे सात लाख रुपये किमतीचा १२० टन मिठाचा साठा मिरज रेल्वे पोलिसांनी सांगलीत गुरुवारी ताब्यात घेतला. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करून एकास अटक केली आहे. गुजरात व तमिळनाडू येथे नरेशकुमार करवा हे ‘सागर केम फूड’ कंपनीमार्फत मीठ उत्पादन करून ‘सागर शुद्ध मीठ’ नावाने विविध राज्यांत विक्री करतात. २००३ पासून ‘सागर मीठ’ नावाची ट्रेडमार्क नोंदणी केली आहे. हलवट येथील आत्माराम चौधरी, अल्लारखा याकूबभाई, राजेशकुमार जैन या उत्पादकांनी सागर ब्रॅन्डची नक्कल करून ‘सागर प्लस’ नावाने मिठाची विक्री सुरू केली आहे. बीड येथील सचिन ट्रेडर्समार्फत सागर प्लस मिठाचा साठा वितरणासाठी रेल्वेने सांगलीत पाठविल्याची माहिती मिळताच नरेशकुमार करवा, पवनकुमार लोया, राम मालू (रा. हैदराबाद) यांनी गुरुवारी सांगली रेल्वेस्थानकातील माल गोदामाजवळ पाहणी केली. तेथे १२० टन साठा मालगाडीतून आणल्याचे दिसून आले. याबाबत करवा यांनी मिरज रेल्वे पोलिसांत फिर्याद दिली.
सांगली स्थानकातून सागर प्लस मिठाचे वितरण करणाऱ्या अक्षय राजमाने (वय २७, रा. बीड) याच्यासह मीठ उत्पादक आत्माराम चौधरी, अल्लारखा याकूब, राजेशकुमार जैन (रा. गुजरात) यांच्याविरुद्ध फसवणूक व कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.