वांगीतील अतिक्रमणे अखेर जमीनदोस्त...
By Admin | Updated: November 23, 2014 23:53 IST2014-11-23T23:04:31+5:302014-11-23T23:53:59+5:30
अनुचित प्रकार नाही : पोलीस बंदोबस्तात कारवाई

वांगीतील अतिक्रमणे अखेर जमीनदोस्त...
वांगी : वांगी (ता. कडेगाव) येथील शासनाच्या जागेत गेली ४० वर्षांपासून असणारे अतिक्रमण हटविण्यास वांगी ग्रामपंचायतीस अखेर यश आले आहे.अतिक्रमण हटविताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ग्रामपंचायतीने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.वांगी येथे गट नं. ३३७ या शासनाच्या मालकीच्या जागेवर ४९४ चौरस मीटरमध्ये पांडुरंग बाबाजी गायकवाड यांनी पक्के घर बांधून जवळपास ४० वर्षांपासून अतिक्रमण केले होते, तर काही लोकांनी गावातील बाजारपेठेच्या मुख्य रस्त्यावर दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते. सप्टेंबर २०१३ मध्ये ग्रामपंचायतीने गावातील सर्व अतिक्रमणधारकाना नोटिसा देऊन अतिक्रमण काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार काही लोकांनी अतिक्रमणे काढून घेतली होती; तर गायकवाड यांनी न्यायालयात धाव घेतली होती.
जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनीदेखील २८ फेबुवारी २०१४ रोजी हे अतिक्रमण तातडीने काढण्याच्या सूचना ग्रामपंचायतीला दिल्या होत्या. त्यानुसार ग्रामपंचायतीने गुरुवार, दि. २० नोव्हेंबर रोजी पोलीस यंत्रणा बोलावून जेसीबीने अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. त्यानंतर गायकवाड यांनी भावनिक आवाहन करून दोन दिवसांनी स्वत: अतिक्रमण काढण्याचे सांगितले; मात्र रविवारी २३ नोव्हेंबर रोजी पुन्हा पोलीस बंदोबस्तात ग्रामपंचायतीने जेसीबीच्या सहायाने अतिक्रमण हटविले.
यावेळी जि. प. सदस्य सुरेश मोहिते, पंचायत समिती सदस्य सखाराम सूर्यवंशी, सरपंच मनीषा कांबळे, ग्रामसेवक विनायक गोवंडे, तलाठी संभाजी शिरतोडे आदी उपस्थित होते. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चिंचणी-वांगी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. (वार्ताहर)
४० वर्षांपासूनचे अतिक्रमण
वांगी येथील शासनाच्या जागेत गेली ४० वर्षांपासून असणारे अतिक्रमण हटविण्याची सूचना जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी २८ फेबुवारी रोजी ग्रामपंचायतीला दिली होती. त्यानुसार ग्रामपंचायतीने दि. २० रोजी जेसीबीने अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. त्यानंतर गायकवाड यांनी भावनिक आवाहन करून दोन दिवसांनी स्वत: अतिक्रमण काढण्याचे सांगितले; मात्र रविवारी ही अतिक्रमणे हटविण्यात आली.