कुरळप पोलिसांच्या निवसस्थानाची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:27 IST2021-08-15T04:27:04+5:302021-08-15T04:27:04+5:30
राजेंद्र पाटील कुरळप : कुरळप (ता. वाळवा) येथील पोलीस ठाण्याच्या इमारतीचे सुशोभीकरण करण्यात आले आहे; मात्र कर्मचाऱ्यांचा आसरा असणारी ...

कुरळप पोलिसांच्या निवसस्थानाची दुरवस्था
राजेंद्र पाटील
कुरळप : कुरळप (ता. वाळवा) येथील पोलीस ठाण्याच्या इमारतीचे सुशोभीकरण करण्यात आले आहे; मात्र कर्मचाऱ्यांचा आसरा असणारी शासकीय निवासाची दुरवस्था तशीच आहे. यामुळे पोलिसांच्या सुविधांकडेही प्रशासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
कुरळप येथे पोलीस ठाण्यास कुरळप ग्रामस्थांनी १९८० मध्ये सात एकर जागा दिली. तेथे १९८२ रोजी पोलीस ठाण्याची निर्मिती झाली. २० गुंठे जागेत पोलीस ठाण्याचे कार्यालय व निवासाची व्यवस्था केली होती. गेल्या चाळीस वर्षांत कुरळप पोलीस ठाणे हे आजही कौलारू रूपातच राहिले आहे. मात्र, येथील कर्मचारी निवासस्थानांची स्थिती दयनीय आहे.
कुरळप पोलीस ठाण्याअंतर्गत २२ गावांचा समावेश असून ४१ कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, कर्मचाऱ्यांसाठी असणारी शासकीय निवासांची व्यवस्था मोडकळीस आली आहे. परिणामी येथे पोलीस उपनिरीक्षकांशिवाय एकही कर्मचारी राहात नाही. उर्वरित कर्मचारी कुरळप परिसरातील गावात खासगी घरात भाडेकरू म्हणून राहतात.
कुरळप पोलीस ठाण्याचे सहायक उपनिरीक्षक दीपक जाधव व त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात अंतर्बाह्य रंगरंगोटी करून चेहरा-मोहरा बदलला आहे. स्वतंत्र स्वागत कक्ष, अभ्यागत कक्ष, स्वच्छ व शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सर्व विभागाचे संगणीकरण करण्यात आले आहे. स्वतंत्र रेकॉर्ड रूम, दारूगोळा हे अद्यावत करून विभागनिहाय आकर्षक मांडणी केली आहे. सर्वसोयींनीयुक्त महिला विश्रांती कक्षाची सोय केली आहे. असे बदल एका बाजूला होत असल्याने दुसऱ्या बाजूला कर्मचाऱ्यांचे निवास्थान दुरवस्थेत आहे.
फोटो- 1)मानांकनासाठी सजलेले कुरळप पोलीस ठाणे
2) कर्मचार्यांच्या निवासाची दुरवस्था