अवजड वाहतुकीमुळे गोटखिंडी-भडकंबे रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:20 IST2021-05-28T04:20:18+5:302021-05-28T04:20:18+5:30
गोटखिंडी : गोटखिंडी (ता. वाळवा) येथील संतोषगिरी डोंगराच्या पलीकडून पोखर्णी, भडकंबे माळ परिसरात मोठ्या प्रमाणात मुरुमाचे उत्खनन सुरू आहे. ...

अवजड वाहतुकीमुळे गोटखिंडी-भडकंबे रस्त्याची दुरवस्था
गोटखिंडी : गोटखिंडी (ता. वाळवा) येथील संतोषगिरी डोंगराच्या पलीकडून पोखर्णी, भडकंबे माळ परिसरात मोठ्या प्रमाणात मुरुमाचे उत्खनन सुरू आहे. क्रशर असल्याने तेथील वाहतूक करण्यासाठी भडकंबे, गोटखिंडी मार्गे २० ते ३० टनांच्या गाड्यांची वाहतूक सुरू आहे. यामुळे रस्त्याची दुरवस्था झाली असून मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. अनेक अपघातही होत आहेत. याकडे जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा गोटखिंडीच्या ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
संतोषगिरी डोंगर परिसरातील वन क्षेत्राला लागूनच भडकंबे बाजूकडून माळ भागात मुरुमाचे मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू आहे. तेथेच काही क्रशरही आहेत. तेथून बाहेर जाणाऱ्या मुरुम व खडीच्या वाहतुकीसाठी २० ते ३० टनांचे डंपर वाहतूक करीत आहेत. या अवजड वाहनांमुळे गोटखिंडी येथील रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. खड्डयांतून दुचाकीस्वारांना जाणे-येणे मुश्कील बनत आहे. अवजड वाहनांमुळे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला गळती लागली आहे. गळती झालेल्या पाईपलाईनमधून दूषित पाणी परत पाईप लाईनमध्ये जाऊन दूषित होत आहे. ग्रामपंचायतीकडून संबंधित ठेकेदारांना माहिती दिली असता दुरुस्तीचे नुसते आश्वासन मिळत आहे. पण गेल्या पंधरा दिवसांत कोणतीही दुरुस्ती झालेली नाही. तरी संबंधित विभागाने उत्खनन होत असलेल्या मुरुमाची व रस्त्याची चौकशी करून रस्ते तत्काळ दुरुस्तीची मागणी होत आहे. ठेकेदाराने रस्ता दुरुस्त न केल्यास गोटखिंडी ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.