गरिबांचा बर्गर महागला, वडापाव, भजी २० रुपयांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:26 IST2021-08-29T04:26:12+5:302021-08-29T04:26:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : गॅस आणि खाद्यतेलाच्या वाढत्या दराने वडापाव, भजी हे सर्वसामान्यांचे खाणेदेखील महागले आहे. स्वत:चा ब्रॅण्ड ...

Poor burgers are expensive, Vadapav, Bhaji at Rs | गरिबांचा बर्गर महागला, वडापाव, भजी २० रुपयांवर

गरिबांचा बर्गर महागला, वडापाव, भजी २० रुपयांवर

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : गॅस आणि खाद्यतेलाच्या वाढत्या दराने वडापाव, भजी हे सर्वसामान्यांचे खाणेदेखील महागले आहे. स्वत:चा ब्रॅण्ड निर्माण केलेल्या व्यावसायिकांनी भजी प्लेट थेट ३० रुपयांवर नेऊन ठेवली आहे. वडा-पावही भज्यांची बरोबरी करत आहे. गेल्या वर्षभरात खाद्यतेल १८० रुपयांवर पोहोचले आहे. व्यावसायिक गॅसने १ हजार ६०० रुपयांचा पल्ला गाठला आहे. डाळीच्या पिठासह अन्य मसालाही महागला आहे. यामुळे भजी विक्रेत्यांसमोर दरवाढीविना पर्याय राहिला नाही. शहरातील आरटीओ कार्यालयासह विविध शासकीय कार्यालयांसमोर दिवसभर मोठा राबता असतो. मुख्य चौकात तसेच ठिकठिकाणच्या खाऊगल्ल्यांमध्येही गर्दीमुळे भज्यांचा खपही खूप असतो. तेथील व्यावसायिकांनी भजी प्लेट २० रुपये केली आहे. काही व्यावसायिकांनी दरवाढीवर पर्याय म्हणून वडा व भज्यांचा आकार कमी करण्याची डोकॅलिटी चालवली आहे.

बॉक्स

खाद्यतेल १८०, गॅस १६०० वर

खाद्यतेल आणि गॅसच्या वाढत्या किमतींमुळे प्रामुख्याने भजी व वडा महागला आहे. कांदा, बटाटा, कोथिंबिरी यांचे दर स्थिर असले, तरी जिरे, ओवा महागला आहे. त्यामुळे विक्रेत्यांना दरवाढीशिवाय पर्याय राहिला नाही.

कोट

दरवाढीने तोंडाची चवच गेली

वडापाव हा माझा आवडता मेनू आहे. दुपारी जेवणासोबत भज्याची प्लेटदेखील असते. २० रुपयांना मिळणारी भजीपाव प्लेट २५ रुपयांवर गेल्यामुळे जेवणावेळी दोघांत एक प्लेट मागवतो.

राजाराम कोरबू, ग्राहक

भज्यांच्या किमती वाढणे अपेक्षितच होते, पण काही ठिकाणी किमती तशाच ठेवून भज्याच्या पिठात भेसळ करून विक्री सुरू आहे. त्यामुळे चांगल्या पिठाच्या भजीसाठी चांगले पैसेही मोजावे लागत आहेत.

- विठ्ठल कोरे, ग्राहक

कोट

दर वाढले, ग्राहक घटले

वडापाव आणि भज्याच्या दरवाढीशिवाय पर्यायच नव्हता. तेलाचा डबा अडीच हजार रुपयांवर पोहोचला आहे. व्यवसायाचा ताळमेळ घालण्यासाठी प्रत्येकी पाच रुपयांची दरवाढ केली आहे. त्याचा थोडा परिणाम ग्राहकांवर दिसत आहे.

- अरविंद जगदेव, विक्रेता

चांगल्या चवीमुळे ग्राहक अद्याप टिकून आहेत. भजी व वडापावसाठी तेल आणि गॅस हे मुख्य घटक आहेत. त्यांची भाववाढ झाल्याने वडापाव व भजीचे दर वाढवावे लागले.

- जितेंद्र भोरे, विक्रेता

Web Title: Poor burgers are expensive, Vadapav, Bhaji at Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.