डाळिंब, द्राक्ष बागायतदार संकटात

By Admin | Updated: September 8, 2015 22:40 IST2015-09-08T22:40:39+5:302015-09-08T22:40:39+5:30

बागांच्या छाटण्या रखडल्या : पाण्याअभावी डाळिंबाच्या फळधारणेबाबत प्रश्नचिन्ह

Pomegranate, grape gardening crisis | डाळिंब, द्राक्ष बागायतदार संकटात

डाळिंब, द्राक्ष बागायतदार संकटात

गजानन पाटील -- संख  -पावसाने दिलेली दडी, कमी झालेली पाण्याची पातळी, कोरड्या पडलेल्या विहिरी व कूपनलिका यामुळे जत तालुक्यातील द्राक्षे व डाळिंब फळबागा संकटात सापडल्या आहेत. द्राक्षबागांच्या छाटणीची कामे खोळंबून राहिली आहेत. सप्टेंबर महिन्यामध्ये डाळिंबाच्या फळधारणा हंगामावर पुरेशा पाण्याअभावी संकट आले आहे. द्राक्ष बागायतदारांनी एप्रिल महिन्यापासून काड्या तयार करण्यासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. तसेच डाळिंबाचा हंगाम धरण्यासाठीही शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्च केले आहेत. पण पावसाअभावी द्राक्षे, डाळिंब फळबागांवर फळधारणेचे प्रश्नचिन्ह लागले आहे. त्यामुळे बागायतदार चिंताग्रस्त बनला आहे.तालुक्यामध्ये प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा शेतकऱ्यांनी पाण्याचा काटकसरीने वापर करीत ठिबक सिंचन, मडकी सिंचनाच्या साहाय्याने उजाड अशा फोंड्या माळरानावर फळबागा उभारल्या आहेत. तसेच कृषी विभागाच्या अनुदानावर व स्वत: शेततळी बांधली आहेत. पाण्याचा नियोजनबद्ध वापर करून दर्जेदार द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते. तालुक्यामध्ये ४ हजार ६६० हेक्टर क्षेत्रावर द्राक्षबागा आहेत.उमदी, तिकोंडी, भिवर्गी, बिळूर, संख, डफळापूर, सिद्धनाथ, जालिहाळ बु।।, रामपूर, कोंतेवबोबलाद, जालिहाळ खुर्द, अमृतवाडी, दरीकोणूर, अंकलगी, करजगी परिसरात द्राक्षबागांचे क्षेत्र अधिक आहे. विहिरीतील काळ्या दगडातील गोड पाणी असल्याने दर्जेदार सुटे खाण बेदाण्याची निर्मिती केली जात आहे.
तालुक्यातील बागायतदार तीन टप्प्यात द्राक्षाची छाटणी घेतो. अंकलगी, संख, अमृतवाडी, मुचंडी परिसरातील काही बागायतदार आगाप सप्टेंबर महिन्यामध्ये द्राक्ष छाटणी करतात. डिसेंबर महिन्यामध्ये द्राक्षे बाजारात येतात. त्याला दर पण चांगला मिळतो. त्यानंतर बहुतांशी बागायतदार दुसऱ्या टप्प्यात आॅक्टोबर, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत छाटणी घेतात.
पूूर्व भागातील तिकोंडी, भिवर्गी, संख परिसरातील द्राक्षबागांची छाटणी डिसेंबरमध्ये केली जाते. हा माल एप्रिल-मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत बाजारात येतो. अनुकूल वातावरणामुळे दावण्या, भुरी रोगाचा प्रादुर्भाव कमी असतो. एकरी १५ ते २० टन कच्चा माल काढला जातो. साखर १०० टक्के भरते. बेदाण्यापेक्षा मार्केटिंगची द्राक्षे परवडतात, असे बागायतदारांचे मत आहे. जोरदार अवकाळी पाऊस व गारपिटीचा मोठा धोका असतो. हा धोका पत्करून द्राक्षाचे उत्पादन घेतले जाते. द्राक्ष बागायतदारांनी एप्रिल-मे महिन्यापासून काड्या तयार करण्याचे काम सुरू केले आहे. फुटवा खुडणे, शेंडा खुडणे, सेंद्रीय, रासायनिक खते, माती टाकणे, औषध फवारणीची कामे केलेली आहेत. पाऊस नसल्यामुळे पाणी पातळी कमी झाली आहे.


पावसाअभावी द्राक्षांच्या छाटण्या खोळंबून राहणार आहेत. छाटण्या केल्या तर पाणी कमी पडणार आहे. दमदार पाऊस झाला तरच यावर्षी द्राक्षे, डाळिंबाची फळधारणा होणार आहे. अन्यथा नाही. आम्ही पावसाच्या प्रतीक्षेत आहोत.
-विलास शिंदे,
द्राक्षे व डाळिंब बागायतदार


कर्जाची परतफेड कशी होणार ?
सोसायटी, बॅँकांकडून शेतकऱ्यांनी बागांवर कर्जे काढली आहेत. बागांचे उत्पादन येईल की नाही याची शाश्वती नसल्याने कर्जाची परतफेड कशी होणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे. पाऊस पडतो की नाही याची शाश्वती नसल्याने सप्टेंबर महिन्यातील छाटण्या खोळंबल्या आहेत. या महिन्यात छाटणी घेण्याच्या मन:स्थितीत शेतकरी नाहीत. पुरेसा पाऊस पडला, तर छाटण्या सुरू होणार आहेत. कमी पाण्यावर, कमी मशागतीच्या खर्चात, डाळिंबाचे पीक उत्पादन घेतले जाते.

Web Title: Pomegranate, grape gardening crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.