राजकारणात गाळेधारकांचा बळी--कुशवाह यांना साकडे

By Admin | Updated: November 16, 2014 23:50 IST2014-11-16T22:39:19+5:302014-11-16T23:50:38+5:30

विट्यातील स्थिती : व्यापाऱ्यांवर उपासमारीची वेळ : अनामत भरूनही गाळे सील

In the politics, the victim of the killers - Kushwaha | राजकारणात गाळेधारकांचा बळी--कुशवाह यांना साकडे

राजकारणात गाळेधारकांचा बळी--कुशवाह यांना साकडे

दिलीप मोहिते --विटा --विटा नगरपरिषदेने शिवाजी चौक व जुनी भाजी मंडई परिसरात नव्याने बांधलेल्या शॉपिंग सेंटरमधील दुकान गाळे सध्या सत्ताधारी, विरोधी नगरसेवक व नागरी हक्क संघटनेच्या राजकीय साठमारीत सापडल्याने गाळेधारकांचा नाहक बळी गेला आहे. गेल्या ५० वर्षांपासूनच्या जुन्या खोकीधारकांनी पालिका प्रशासनाला योग्य ते सहकार्य करून दुकाने काढून घेतली. आता नव्या इमारतीतील गाळ्यांची पालिकेने सांगितलेली अनामत रक्कम भरूनही राजकीय वादामुळे ही न्यायप्रविष्ट बाब झाल्याने गाळे सील करावे लागले. त्यामुळे गाळेधारकांसह त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे.
विटा येथील शिवाजी चौक व जुनी भाजी मंडई परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून लाकडी खोकी होती. त्या खोक्यात व्यापारी व्यवसाय करीत होते. कालांतराने शहराच्या मुख्य चौकातच पालिकेने नवीन शॉपिंग सेंटर उभारून त्यात खोकीधारकांना प्राधान्याने गाळे वाटप करण्याचे अभिवचन दिले. त्यामुळे खोकीधारकांनी स्वखर्चाने आपली दुकाने काढून घेऊन प्रशासनाला सहकार्य केले. दोन-तीन वर्षात याठिकाणी टोलेजंग व्यापारी संकुल उभारले. संकुलात जुन्या खोकीधारकांना प्राधान्याने गाळे वाटप करण्याचा शब्द पाळण्याचे ठरविले.
त्यानुसार शासनाच्या नियमाप्रमाणे अनामत रक्कम जमा करून घेऊन ३१ खोकीधारकांना गाळ्यांचे वाटप करण्यात आले. मात्र, तेथूनच राजकीय वादाला सुरूवात झाली. विरोधी नगरसेवक, नागरी हक्क संघटना व सत्ताधारी यांचा राजकीय संघर्ष पुणे आयुक्त कार्यालयापर्यंत पोहोचला.
त्यात नागरी हक्क संघटना व विरोधी नगरसेवकांनी गाळेवाटप प्रक्रियेला स्थगिती मिळविली. त्यामुळे अनामत रकमा भरून घेऊन जुन्या खोकीधारकांना प्राधान्याने वाटप झालेले गाळे सील करण्यात आले. विरोधकांना आनंद झाला पण, व्यापाऱ्यांची दुकाने सील होऊन त्यांची रोजीरोटी बंद झाल्याने या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली.
विटा शहरात सध्या विरोधक, सत्ताधारी व आता गेल्या वर्ष-दीड वर्षापासून जन्माला आलेल्या नागरी हक्क संघटना पालिकेच्या राजकीय पटलावर चांगलीच तापली आहे. त्यांच्यातील राजकीय साठमारी व वादात मात्र व्यापाऱ्यांचा नाहक बळी जात आहे.

पालिकेने सांगितलेली वाढीव अनामत रक्कम भरूनही आमचे गाळे सत्ताधारी, विरोधी नगरसेवक व नागरी हक्क संघटनेच्या राजकीय साठमारीत सीलबंद झाले आहेत. त्यामुळे आम्हा व्यापाऱ्यांवर अन्याय झाला असून त्यात गाळेधारक व्यापाऱ्यांचा नाहक बळी जात आहे. त्यामुळे यातून योग्य तो तोडगा काढून आम्हा व्यापाऱ्यांना न्याय द्यावा, यासाठी गेल्या ४० वर्षांपासून त्या जागेवर व्यवसाय करणारे जुने व्यापारी संपत कांबळे, किरण भिंगारदेवे, धोंडिराम पवार, सुरेश शिंगे, अमोल आहुजा, शंकर सीताराम सकट, शिवराम पवार व सुशिला कोरडे या नऊ व्यापाऱ्यांनी न्यायासाठी जिल्हाधिकाऱ्यांचा दरवाजा ठोठावला आहे.

Web Title: In the politics, the victim of the killers - Kushwaha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.