इस्लामपुरात विकासापेक्षा कुरघोड्यांचेच राजकारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:24 IST2021-03-24T04:24:11+5:302021-03-24T04:24:11+5:30
ओळी : पालिकेच्या नियोजनाअभावी निनाईनगरमधील ओसाड झालेली बाग. अशोक पाटील लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : गेल्या चार वर्षांत ...

इस्लामपुरात विकासापेक्षा कुरघोड्यांचेच राजकारण
ओळी : पालिकेच्या नियोजनाअभावी निनाईनगरमधील ओसाड झालेली बाग.
अशोक पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : गेल्या चार वर्षांत सत्ताधारी विकास आघाडीने विकासच केला नाही. याउलट संख्याबळ असलेल्या विरोधी राष्ट्रवादीवर दबावतंत्राचेच राजकारण केले. पालिकेतील तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादीने तीस वर्षे जे पेरले तेच आता विकास आघाडीच्या माध्यमातून उगवू लागले आहे.
राष्ट्रवादीने पालिकेवर तीस वर्षे सत्ता केली. या काळात विरोधकांना टार्गेट करून त्यांचे खच्चीकरण करण्याचे राजकारण केले. तो कित्ता आता गेल्या चार वर्षांपासून सत्ताधारी विकास आघाडी करत आहे. शहराच्या विकासाला गती तर दिलीच नाही. शिवाय झालेली विकासकामे नियोजनाअभावी दुर्लक्षित झाली आहेत. प्रामुख्याने निनाईनगर, मंत्री कॉलनी आणि विशालनगरमधील बगिचांवर कोट्यवधी रुपयांचा खर्च वाया जाणार आहे. याउलट नगरपालिकेच्या मालकीच्या जागेत तयार झालेले परंतु खासगीकरणाच्या माध्यमातून उत्तमरीत्या सुरू असलेला विजयभाऊ पाटील बहुउद्देशीय हॉल आणि निनाईनगरमधील एन.ए. कला क्रीडा मंडळाच्या माध्यमातून सुरू असलेल्या जयंत पाटील स्पोर्ट्सची वाटचाल मोडीत काढण्याचा डाव विकास आघाडीने केला आहे. या दोन्ही संस्थेच्या जवळपास असलेल्या बागेची आणि पोहण्याच्या तलावाची अवस्था काय आहे, हे साऱ्या इस्लामपूरकरांना माहीतच आहे.
सत्ताधारी तत्कालीन राष्ट्रवादीने आपल्या तीस वर्षांच्या कालावधीत विविध विकासकामांना गती दिली. यातील काही वास्तूंना राजारामबापू पाटील, जयंत पाटील, विजयभाऊ पाटील आदींची नावे देण्यात आली. हाच कित्ता आता विकास आघाडी गिरवीत आहे. पालिकेच्या मालमत्तेला अण्णासाहेब डांगे आणि नानासाहेब महाडिक यांचे नाव देण्याचे राजकारण पेटले आहे. तर राष्ट्रवादीकडे अल्प रकमेत भाडेतत्त्वावर असलेल्या काही जागा ताब्यात घेण्याचा घाट विकास आघाडीने घातला आहे. या दोन्ही गटांतील लोकप्रतिनिधींनी शहरातील विकासापेक्षा सभागृहात कुरघोड्यांचेच राजकारण सुरू असल्याचे दिसत आहे.
चौकट
तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादीने निनाईनगरमधील व्यायामशाळा एन.ए. गु्रपला भाडेतत्त्वावर देण्याच्या ठरावाला त्या वेळेचे विरोधी पक्षनेते विजय कुंभार यांनी विरोध करून ही प्रक्रिया चुकीची आहे. यांच्यावर कलम ३०८ नुसार तक्रार दाखल करता येते का, असा प्रश्न उपस्थित करत विरोध दर्शविला होता. याला तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी होकार दिला. परंतु तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादीने या दोन वास्तू बहुमताच्या जोरावर बेकायदेशीररीत्या घेतल्याची चर्चा पालिका वर्तुळातून होऊ लागली आहे.