इस्लामपुरात मालमत्ता कराचे राजकारण पेटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:40 IST2020-12-13T04:40:23+5:302020-12-13T04:40:23+5:30

इस्लामपूर : पालिकेतील तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादीने चतुर्थ मालमत्ता करआकारणी बारा वर्षांहून अधिक काळ झाला, तरी केली नाही. या-ना त्या ...

The politics of property tax ignited in Islampur | इस्लामपुरात मालमत्ता कराचे राजकारण पेटले

इस्लामपुरात मालमत्ता कराचे राजकारण पेटले

इस्लामपूर : पालिकेतील तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादीने चतुर्थ मालमत्ता करआकारणी बारा वर्षांहून अधिक काळ झाला, तरी केली नाही. या-ना त्या कारणासाठी पुढे ढकलली. त्यानंतर विकास आघाडी सत्तेवर आली. त्यांनी सर्व्हे करून वाढीव आकारणी केली. यावर सत्ताधारी आणि विरोधी राष्ट्रवादीच्यावतीने नागरिकांनी आपीलही केले. गेल्या चार वर्षात यावर ठोस आवाज उठवला नाही. आता जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी लक्ष वेधल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधी राष्ट्रवादीत मालमत्ता करावरून राजकारण पेटले आहे.

मार्चमध्ये इस्लामपूर शहरात कोरोना महामारीने शिरकाव केला. त्यामुळे २१ हजार मालमत्ताधारकांपैकी आठ हजार मालमत्ताधरकांनी वाढीव कर आकारणीविरोधात अपील केले होते. कोरोनामुळे १३ हजार मालमत्ताधारकांनी अपील करणे बाकी आहे. यावर निर्णय होण्याअगोदरच नवीन करवाढ केली. त्यामुळे मालमत्ताधारकांवर अन्याय झाला आहे. यावर शिवसेनेने आवाज उठवला; पण याची दखल घेतली नाही. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शहरात घेतलेल्या बूथ कमिटी बैठकीत नागरिकांनी तक्रारी मांडल्या. यावर जयंत पाटील यांनी भाष्य केल्यानंतर राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी जागे होऊन आंदोलनाचा पवित्रा घेतला. यावर नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी जयंत पाटील यांनाच प्रतिआव्हान केले आहे.

कोरोनामुळे सर्वच क्षेत्रातील उद्योग अडचणीत आले आहेत. चिकुनगुन्या, डेंग्यूसारखे रोग फैलावत आहेत. विकासकामे थांबली आहेत. रस्त्यावरून जाताना नागरिकांना जीव मुठीत धरून जावे लागते. काही प्रभागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. आरोग्य सेवा विस्कळीत झाली आहे. त्यातच वाढीव वीजबिल आणि आता मालमत्ता करवाढ आदी प्रश्न असताना, राष्ट्रवादी आणि विकासआघाडी राजकारण करत आहे. यावर जयंत पाटील यांनी ठोस तोडगा काढावा, अशी नागरिकांची माफक अपेक्षा आहे.

कोट

कोरोना, वाढीव वीजबिल. डेंग्यू आणि वाढीव मालमत्ता कर त्यामुळे सामान्य नागरिकांना जगणे मुश्किल झाले आहे. मालमत्ता करावर शिवसेनेने वेळोवेळी आवाज उठवला आहे. आता भाजप, राष्ट्रवादी जागे झाले आहेत. याचे राजकारण करण्यापेक्षा एकत्रित बसून हा प्रश्न सोडवावा.

आनंदराव पवार, नगरसेवक, इस्लामपूर

फोटो- इस्लामपूर नगरपालिका लोगो

Web Title: The politics of property tax ignited in Islampur