इस्लामपुरातील विकासकामांबाबत राष्ट्रवादीकडून राजकारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:34 IST2021-06-09T04:34:41+5:302021-06-09T04:34:41+5:30
इस्लामपूर : इस्लामपूर शहरातील २ कोटी ८० लाख रुपयांच्या विकासकामांना नगरविकास विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. या विकासकामाचे प्रस्ताव ...

इस्लामपुरातील विकासकामांबाबत राष्ट्रवादीकडून राजकारण
इस्लामपूर : इस्लामपूर शहरातील २ कोटी ८० लाख रुपयांच्या विकासकामांना नगरविकास विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. या विकासकामाचे प्रस्ताव विकास आघाडीनेच पाठविले होते. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळातील स्वच्छ सर्वेक्षणात शहराचा देशात चाैदावा, तर पश्चिम विभागात नववा क्रमांक आला होता. त्यासाठी १५ कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. ही वस्तुस्थिती दडवून राष्ट्रवादीकडून विकास कामातही राजकारण केले जात असल्याचा आरोप नगरसेवक विक्रम पाटील यांनी केला.
पालिकेतील नगराध्यक्ष दालनात पत्रकार बैठक झाली. यावेळी नगराध्यक्ष निशिकांत भाेसले-पाटील, वैभव पवार, अजित पाटील उपस्थित होते. पाटील म्हणाले, पहिल्या टप्प्यातील ७ कोटी ५० लाखांची रक्कम उपलब्ध झाली आहे. विकास आघाडीने एकूण २० कामाचे प्रस्ताव या निधीतून पाठविले आहेत. त्यातील २ कोटी ८० लाखांच्या दहा कामांना मान्यता मिळाली आहे. हा सर्व निधी फडणवीस यांनी राज्यात राबविलेल्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानातील आहे. मात्र विरोधकांकडे फडणवीस यांचे नाव घेण्याचा मोठेपणा दिसून आला नाही. त्यांना विकास कामातही राजकारणच करायचे आहे, हे स्पष्ट झाले आहे.
ते म्हणाले, विकास आघाडीने साडेचार वर्षांत काय काम केले, अशी विचारणा राष्ट्रवादीचे नगरसेवक करतात. मात्र गेल्या ३० वर्षांत राष्ट्रवादीला जेवढा विकास करता आला नाही तेवढा विकास करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. आगामी निवडणुकीपूर्वी ९० टक्के विकासकामे पूर्ण करू. शहरातील जनतेला दिलेला शब्द पाळणार आहोत. सत्तेच्या माध्यमातून एकाही कुटुंबाला त्रास दिलेला नाही किंवा आकसापोटी कुणावरही सत्तेचा गैरवापर केलेला नाही. त्यामुळे विकास आघाडीच्या कामाबाबत शहरातील जनता आनंदी आहे.
नगराध्यक्ष पाटील म्हणाले, उर्वरित ३ कोटी ९६ लाख रुपयांच्या निधीतून संपूर्ण शहरामध्ये साईन बोर्ड लावले जाणार आहेत. ८० फुटी रस्त्यावर दुभाजक आणि दोन्ही बाजूला पदपथ होणार आहे. महत्त्वाच्या चौकांचे सुशोभिकरण केले जाणार आहे. नगराध्यक्षांच्या अधिकारातील निधीतून कामेरी नाका आणि कोल्हापूर नाका येथे वाहतूक नियंत्रणाचे सिग्नल लावण्याचे काम पुढील आठवड्यात सुरू होत आहे. विरोधकांनी विकासकामांबाबत राजकारण करू नये.