इस्लामपुरात वैद्यकीय सेवेचे राजकारण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:25 IST2021-05-10T04:25:44+5:302021-05-10T04:25:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : कोरोनाचे रुग्ण उपचाराविना मरत आहेत. वैद्यकीय सेवा व्यावसायिक बनल्या आहेत, यामध्येही राजकीय नेत्यांनी शिरकाव ...

इस्लामपुरात वैद्यकीय सेवेचे राजकारण
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : कोरोनाचे रुग्ण उपचाराविना मरत आहेत. वैद्यकीय सेवा व्यावसायिक बनल्या आहेत, यामध्येही राजकीय नेत्यांनी शिरकाव केला आहे. शहरातील लक्ष्मी नारायण कोविड सेंटरच्या कारभारात राजकारण शिरले आहे. काही नेते कोविड सेंटरच्या बाजूने आहेत, तर काही नेते हे कोविड सेंटर उद्ध्वस्त करण्यासाठी धडपडत आहेत.
डॉ. सचिन यांनी नोकरीच्या माध्यमातून इस्लामपुरात पाऊल ठेवले. त्यानंतर दोन-चार वर्षांत त्यांनी शहरात कराराने जागा घेतली. त्या ठिकाणी साईच्या नावाने रुग्णालय सुरू केले. साईंच्या कृपेने रुग्णांचा विश्वास बसला. लक्ष्मी चालून आली. पहिल्या लाटेत साईला पेमेंट घेऊन रुग्णावर उपचार करण्याची परवानगी मिळाली. सर्वच खाजगी रुग्णालयांनी भरमसाठ लावलेल्या बिलाचे ऑडिट व्हावे अशी मागणी मंत्री जयंत पाटील यांनी केली होती. तोपर्यंत खाजगी रुग्णालयांनी लूट केली .
दुसरी लाट आली आणि खाजगी रुग्णालये कोविड सेंटर मिळण्यासाठी वशिला लावू लागले.
डॉ. सचिन यांनी पेठ रस्त्यावरील हॉटेलमध्ये एका नेत्याला हाताशी धरून १०० बेडचे टोलेजंग कोविड सेंटर सुरू केल्याचा आरोप सोशल मीडियावर केला जात आहे. या परिसरातील खाजगी सर्वांत मोठे रुग्णालय म्हणून परिचित झाले. बेड फुल्ल झाले; परंतु या रुग्णालयात राजकीय नेता शिरला आणि या नेत्याचे विरोधक उठून बसले. दुसऱ्या लाटेत रुग्ण मरण्याचा टक्का वाढला होता. रुग्ण बरा झाला की आनंदाने नातेवाईक बिले भरतात, रुग्ण दगावला की बिलात खुसपट काढून वाद घालणाऱ्या नातेवाइकांना तोंड द्यावे लागते, असेच प्रकार विरोधकांनी उचलून धरले आहेत. हाच राजकीय संघर्ष आता लक्ष्मी नारायण कोविड सेंटरच्या अंगलट आला आहे. आता प्रकरणाची चौकशी होण्यासाठी विविध संघटना एकाछताखाली येत आहेत.
फोटो : हेच ते पेठ रोडवरील पूर्वीचे रमाडा हॉटेल. आता लक्ष्मी-नारायण कोविड सेंटर.