दुष्काळी फोरममधील नेत्यांना राजकीय सुकाळ
By Admin | Updated: May 22, 2015 00:12 IST2015-05-21T23:21:50+5:302015-05-22T00:12:28+5:30
समीकरणे बदलली : निवडणुका, संस्थात्मक कारभारात दबावगट

दुष्काळी फोरममधील नेत्यांना राजकीय सुकाळ
अविनाश कोळी -सांगली -दुष्काळी भागातील प्रश्नांसाठी दबावगट म्हणून स्थापन झालेल्या दुष्काळी फोरमच्या नेत्यांना सध्या राजकीयदृष्ट्या सुकाळ निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील अनेक निवडणुका, संस्थात्मक कारभारामध्ये फोरमचा हा दबावगट सध्या प्रभावी ठरत आहे. लोकसभा निवडणुकीपासून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीपर्यंतचा त्यांचा प्रवास जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणारा ठरला आहे.
आघाडी सरकारच्या कालावधित दुष्काळी प्रश्नांचा पाठपुरावा करण्याच्या निमित्ताने हा फोरम स्थापन झाला. यामध्ये खासदार संजय पाटील, आ. विलासराव जगताप, आ. अनिल बाबर, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, माजी मंत्री अजितराव घोरपडे, राजेंद्रअण्णा देशमुख यांचा समावेश आहे. दुष्काळी प्रश्नांचा पाठपुरावा सुरू असतानाच राजकीयदृष्ट्या हा फोरम अधिक प्रभावशाली बनत गेला. अर्थात या फोरमला आ. जयंत पाटील यांची रसद असल्याची बाब राजकीय वतुर्ळात लगेचच चर्चेत आली. यामध्ये बहुतांश नेते राष्ट्रवादीत होते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने फोरमचे नेते भाजप आणि शिवसेनेत गेले. लोकसभा निवडणुकीत संजयकाकांना याच फोरमचा सर्वाधिक लाभ झाला होता. तालुक्यातील नेत्यांची ताकद या माध्यमातून त्यांना मिळाली.
फोरममधील संजय पाटील यांना खासदारकीचा, तर अनिल बाबर व विलासराव जगताप यांना आमदारकीचा लाभ झाला. त्यामुळे फोरमची ताकद वाढली. जयंत पाटील यांची फोरमच्या नेत्यांशी असलेली सलगीसुद्धा या ताकदीचाच भाग मानली जाते. सध्या जिल्ह्यात सर्वाधिक प्रभावशाली नेते म्हणून जयंतरावांचे नाव घेतले जाते. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, जिल्हा बँक अशा महत्त्वाच्या संस्थांवर त्यांचे वर्चस्व आहे. तरीही जयंतरावांवर दुष्काळी फोरमचाच प्रभाव आहे. जयंतरावांच्या बहुतांश निर्णयात आता फोरमच्या नेत्यांचा प्रभाव दिसून येतो. जयंत पाटीलही निर्णयप्रक्रियेत फोरमच्या नेत्यांचे मत घेण्यास विसरत नाहीत. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचे पॅनेल निश्चित करण्यापासून ते अध्यक्ष निवडीपर्यंतच्या सर्व प्रक्रियेवर दुष्काळी फोरमचा वरचष्मा होता. पॅनेलची स्थापना होत असताना फोरमचेच नेते चर्चेत आघाडीवर होते. ऐनवेळी कदम गटाला डावलून त्यांनी पॅनेल स्थापन केले.
मदन पाटील यांना पॅनेलमध्ये सामावून घेण्याची किमयासुद्धा फोरमच्याच नेत्यांनी केली. जयंतरावांनी गेल्या काही वर्षातील राजकीय डाव याच फोरमच्या नेत्यांच्या ताकदीवर जिंकले आहेत. त्यामुळे फोरमच्या नेत्यांना त्यांच्या निर्णयप्रक्रियेत महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.
घोरपडेंचा गट बाजूला
दुष्काळी फोरमचाच एक भाग असलेल्या अजितराव घोरपडेंचा मार्ग आता बदलला आहे. फोरमच्या नेत्यांची एक कडी तुटली आहे. संजयकाका आणि त्यांच्यातील दरी रुंदावल्यामुळे दबावगटातील घोरपडेरूपी ताकद कमी झाली आहे.
यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या विक्री व्यवहारप्रकरणी आ. अनिल बाबर आणि खासदार संजय पाटील या फोरमच्याच दोन नेत्यांमध्ये वाद निर्माण झाले होते. जिल्हा बॅँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीवेळी दोन्ही नेते एकत्र आले.
कदम गटाला विरोध
फोरममधील नेत्यांच्या ‘रडार’वर सध्या आ. पतंगराव कदम यांचा गट आहे. संजय पाटील, विलासराव जगताप, पृथ्वीराज देशमुख हे महत्त्वाचे तिन्ही नेते सध्या कदम गटाच्या विरोधात काम करीत आहेत. जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीत कदम गटास सर्वपक्षीय पॅनेलपासून दूर ठेवण्यात आले. अध्यक्षपदाच्या निवडीवेळी पतंगरावांचे पाहुणे म्हणून मानसिंगरावांच्या नावाला विरोध दर्शविण्यात आला. त्यामुळे मानसिंगराव नाईक यांचा पत्ता कट झाला. जयंतरावांना सर्वाधिकार असूनही फोरमचा दबावगट प्रभावी ठरला.