नामकरणासह छायाचित्र लावण्यामागे राजकीय स्टंटबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:26 IST2021-03-17T04:26:45+5:302021-03-17T04:26:45+5:30
अशोक पाटील लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : इस्लामपूर नगरपालिकेच्या सभागृहात कार्यकर्त्याने छायाचित्र झळकावणे आणि नामकरण करण्यामागे निव्वय राजकीय स्टंटबाजी ...

नामकरणासह छायाचित्र लावण्यामागे राजकीय स्टंटबाजी
अशोक पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : इस्लामपूर नगरपालिकेच्या सभागृहात कार्यकर्त्याने छायाचित्र झळकावणे आणि नामकरण करण्यामागे निव्वय राजकीय स्टंटबाजी असल्याचे दिसून आले आहे. नगरपालिकेतील पदाधिकाऱ्यांचा वचक नसल्याचा हा परिणाम मानला जात आहे.
सोमवारी एका कार्यकर्त्याने अशी स्टंटबाजी करण्यामागे आगामी नगरपालिका निवडणुकीत कोणीतरी दखल घेऊन आपल्याला उमेदवारी द्यावी, हाच हेतू होता. राष्ट्रवादी आणि विकास आघाडीतील अनुक्रमे डांगे आणि महाडिक गटाशी जवळीक साधून त्याने ही स्टंटबाजी केली.
नगरपालिकेत राष्ट्रवादीची तीस वर्षे सत्ता होती. या कालावधीत शहरातील बगीचे, सभागृह, नाट्यगृह, रस्ते, चौक यांना नावे देण्याचा सपाटा राष्ट्रवादीने लावला. प्रत्येक वास्तू आणि बगीचााला राजारामबापू पाटील यांचे नाव देणे विरोधकांच्या पचनी पडले नाही. त्यामुळे नाट्यगृहाला नाव देताना वाद उफाळून आला होता. त्यानंतर पालिकेतील सभागृहाला अण्णासाहेब डांगे यांचे नाव देण्यात आले. त्यात त्यांच्या गटाचे तत्कालीन नगरसेवक चंद्रकांत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे नगरसेवक पुढे होते. आता आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या कार्यकर्त्याने स्टंटबाजी करत पालिकेत घुसत अण्णासाहेब डांगे यांचे छायाचित्र परस्पर सभागृहात लावले आणि पालिकेच्या संकुलावर नानासाहेब महाडिक यांच्या नावाचा कापडी फलक लावला. नगरपालिकेतील पदाधिकाऱ्यांचा वचक नसल्याचा हा परिणाम मानला जात आहे.
कोट
विकास आघाडीने शहराच्या विकासाला गती आली आहे. नाव देण्यासंदर्भात कोणतेही राजकारण करण्याचा हेतू नाही. पालिकेच्या मालमत्तेवर असे अचानक फलक लावणे म्हणजे नेत्यांचा अपमानच नाही का? छायाचित्र लावणे किंवा नामकरण करताना कायद्याची प्रक्रिया बघावी लागते.
- विक्रम पाटील, गटनेते, विकास आघाडी