कृष्णाकाठी रंगली राजकीय टोलेबाजी
By Admin | Updated: November 13, 2016 23:47 IST2016-11-13T23:47:15+5:302016-11-13T23:47:15+5:30
रुसवा-फुगवीचा खेळ : पक्षांतर्गत संघर्षातून काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केली खदखद

कृष्णाकाठी रंगली राजकीय टोलेबाजी
सांगली : वसंतदादांच्या जन्मशताब्दी सोहळ्यालाही स्थानिक पक्षांतर्गत संघर्षाचा रंग लागला. भाषणांमधून एकमेकांना डिवचण्याची संधी नेत्यांनी सोडली नाही. दुसरीकडे रुसवा-फुगवीच्या खेळातून काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरविली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनाही या गोष्टींची दखल घेत, भाषणातून सर्वांना सबुरीचा सल्ला द्यावा लागला.
विधानपरिषदेच्या निवडणुकीत दादा व कदम गटातील संघर्ष टोकाला गेला आहे. दोन्ही गटांमध्ये कुरघोड्यांचे राजकारणही रंगले आहे. विशाल पाटील गटाने बंडखोरी केल्यामुळे या निवडणुकीत कॉँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराच्या अडचणी वाढल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीचे पडसाद वसंतदादा जन्मशताब्दी सोहळ्यात उमटणार, अशी शक्यता वर्तविली जात होती.
कार्यक्रमात पतंगराव कदम म्हणाले की, वसंतदादांनी १९७१ मध्ये मला मुंबईत सरचिटणीसपद दिले. निवडीचे फलक झळकल्यानंतर ते लगेच पक्षांतर्गत संघर्षातून उतरले सुद्धा होते. अशी अनेक वादळे मी झेलली आहेत. वसंतदादांनी ज्यापद्धतीने या संघर्षाला तोंड दिले, त्याचपद्धतीने मीसुद्धा देत आहे. अन्य लोकांनीही दादांचा आदर्श घेऊन कार्यरत राहावे. छदमी राजकारण सोडून पुढे गेले पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला.
पतंगराव कदम यांचे भाषण होण्यापूर्वी कार्यक्रमाच्या ठिकाणी आलेले युवक कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम वसंतदादांच्या स्मारकास अभिवादन करून पुन्हा निघून गेले होते. जयश्रीताई पाटील, महापौर हारुण शिकलगार यांच्यासह मदनभाऊ गटातील नगरसेवक, कार्यकर्ते यांनी स्मारकस्थळी हजेरी लावून कार्यक्रमाकडे पाठ फिरविली. दिवसभर याविषयी चर्चा सुरू होती. (प्रतिनिधी)
पतंगरावांनी सर्वांना एकत्रित करावे...
या सर्व गोष्टींची दखल अशोक चव्हाण यांना घ्यावी लागली. कार्यक्रमात ते म्हणाले की, वसंतदादांचा आदर्श घेऊनच जिल्ह्यातील नेत्यांनी वाटचाल केली पाहिजे. वसंतदादांचे वारसदार म्हणून प्रतीक पाटील, विशाल पाटील यांनी दादांच्या विचाराने काम करावे. पतंगराव कदम हे ज्येष्ठ नेते असून, त्यांच्याबद्दल आदर ठेवावा. पतंगरावांनीही मोठे बंधू म्हणून सर्वांनाच एकत्रित करावे, असे आवाहन त्यांनी केले.