इस्लामपुरात धडाडणार राजकीय तोफा

By Admin | Updated: November 13, 2016 01:20 IST2016-11-13T00:48:57+5:302016-11-13T01:20:51+5:30

आरोपांचा दारुगोळा तयार : विकास, भकास आणि भ्रष्टाचाराचे मुद्दे केंद्रस्थानी

Political guns in Islamabad | इस्लामपुरात धडाडणार राजकीय तोफा

इस्लामपुरात धडाडणार राजकीय तोफा

अशोक पाटील --रइस्लामपुरातील प्रत्येक प्रभागात पालिका निवडणुकीच नगारे वाजू लागले आहेत. बहुतांशी प्रभागात दुरंगी, तिरंगी-चौरंगी लढती आहेत. यामुळेच सत्ताधारी राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील शहरात तळ ठोकून आहेत. विरोधी विकास आघाडीत सहभागी झालेल्या शिवसेनेने प्रभाग दहामध्ये बिनविरोध बाजी मारल्याने विकास आघाडी सध्या जोमात आहे. या अटीतटीच्या लढतीत सत्ताधारी राष्ट्रवादी गेल्या तीस वर्षांत केलेल्या विकासकामांचा पाढा पुन्हा गिरविणार, तर विरोधकांकडून शहर भकास कसे झाले, हे मुद्दे ऐरणीवर धरून प्रचारसभा गाजणार आहेत.
सत्ताधारी आणि विरोधकांच्या सभा गाजविण्याचा केंद्रबिंदू शहरातील मध्यवर्ती यल्लम्मा चौक असणार आहे. आजवरचा अनुभव पाहता, या सभांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणार, हेही स्पष्ट आहे. सभांमध्ये हौसे, नवसे, गवसे यांची रेलचेल राहणार आहे. या सभांमुळे ऐन थंडीत प्रचाराची हवा गरम राहणार आहे.
राष्ट्रवादीचे मातब्बर, अनुभवी आणि ज्येष्ठ नेते विजयभाऊ पाटील नगराध्यक्षपदाचे दावेदार आहेत. त्यांचा कोणत्याही परिस्थितीत विरोधकांना झिरो करण्याचा विडा शिवसेनेने प्रभाग १० मध्ये सीमा पवार यांना बिनविरोध निवडून आणून हाणून पाडला आहे. यामुळे विजयभाऊ पाटील यांनी गेल्या तीस वर्षांत पालिकेच्या कारभारात ‘दहा रुपयाचा भ्रष्टाचार केल्याचे सिध्द करून दाखवा, मी गाव सोडतो’ असे आव्हान विरोधकांना दिले आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या मुद्यावर विरोधक आक्रमक होणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत.
उरुण परिसरात विद्युत कामगारांचे नेते प्रकाश पाटील यांचे योगदान मोठे राहिले आहे. त्यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव निशिकांत पाटील यांनी विद्युत कामगार संघटनेची धुरा खांद्यावर घेतली. पालिकेच्या राजकारणापासून दूर राहात त्यांनी शहरानजीक शिक्षण व वैद्यकीय संकुल उभारले. जयंत पाटील यांचे नेतृत्व मानून सक्रिय राजकारणापासून अलिप्त राहताना त्यांनी संकुलाचा व्याप वाढविला. राजारामबापू पाटील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अ‍ॅन्ड पी जी. इन्स्टिट्यूट या संस्थेची स्थापना केली. त्यानंतर प्रकाश मेडिकल इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्स, प्रकाश पब्लिक स्कूलच्या माध्यमातून भव्य शिक्षण व वैद्यकीय संकुल आकारास येत असताना, अचानक त्यांनी इस्लामपूर शहरासाठी जयंत पाटील यांनी आणलेल्या निधीच्या मानाने विकास झाला नसल्याचा आरोप करीत थेट विरोधी आघाडीकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी दाखल केल्याने शहरवासीयांच्या भुवया उंचावल्या आहेत.
यामुळे निशिकांत पाटील हे निवडणूक प्रचारात शहराचा न झालेला विकास, शहराची भकास अवस्था व त्यांना अपेक्षित असलेला विकास, याच मुद्द्यांवर आपल्या प्रचाराचा अजेंडा राबविणार का? हा प्रश्न आहे.
सत्ताधारी राष्ट्रवादीला टार्गेट करण्यासाठी विकास आघाडीचे नेते आरोपांचा दारूगोळा जमा करून तयारीत आहेत. यल्लम्मा चौकातील सभेत फक्त शहर कसे भकास झाले व विकासाच्या नावाखाली सत्ताधाऱ्यांनी कसा भ्रष्टाचार केला, याचा पर्दाफाश करण्यासाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार शिवाजीराव नाईक, नानासाहेब महाडिक, बाबासाहेब सूर्यवंशी, विक्रमभाऊ पाटील सत्ताधाऱ्यांवर तोफा डागतील.
विरोधकांच्या आरोपांना सडेतोड उत्तर देण्यासाठी सत्ताधाऱ्यांनीही मुलुखमैदानी तोफा तयार ठेवल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील, माजी नगराध्यक्ष भगवान पाटील, अ‍ॅड. चिमण डांगे, खंडेराव जाधव, तर मार्मिक टोले लगावणारे माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांची भाषणे लक्षवेधी ठरणार, हे स्पष्ट आहे.


आरोप-प्रत्यारोपांना फाटा
तिसऱ्या आघाडीचे नेते मात्र या साऱ्या धामधुमीपासून दूर राहून स्वतंत्रपणे प्रचारयंत्रणा राबविणार, असे स्पष्ट चित्र असून, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्राचार्य विश्वास सायनाकर यांच्यासह तिसऱ्या आघाडीच्या नेतेमंडळींनी आरोप-प्रत्यारोपांना फाटा देत शहराच्या विकासाचा अजेंडा घेऊन मतदारांच्या भेटीगाठी घेऊन प्रबोधनाचा संकल्प केला आहे.


इस्लामपुरात : गुंडगिरी चर्चेत
प्रभाग १० मध्ये शिवसेनेच्या सीमा पवार या बिनविरोध निवडून आल्यानंतर शहरातील गुंडगिरीवर माजी मंत्री जयंत पाटील यांनी तोफ डागली आहे. त्यामुळे दोन्ही आघाडीत फाळकूटदादांना जोर चढला आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात चुरशीच्या प्रभागात गुंडगिरी प्रशासनासमोर डोकेदुखी ठरणार आहे. याला वेळीच आवर घालणे गरजेचे आहे.

Web Title: Political guns in Islamabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.